खुली जो आंख तो …………

सहसा संगीतातला नवीन प्रकार ऐकायला आपली सुरुवात होते ती लोकप्रिय काय असेल ते कानावर पडल्यावर. गझलच्या बाबतीत माझेही असेच झाले...सिनेसंगीतामधील गझल ऐकल्या. अर्थमधील गाणी आवडली, उमराव जान सारख्या सिनेमातील काही शायरी समजायला लागली पण तो आपला प्रांत नव्हे असे वाटायचे. त्यानंतर निकाह चित्रपटामुळे गुलाम अली यांची ओळख झाली. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद ही गझल पॉझेस, तबल्याची साथ आणि एकूणच त्यामुळे होणारा माहोल यामुळे आवडली. नंतर माझा भाऊ सुधीर किर्लोस्कर याने गझल अभ्यासपूर्वक ऐकायला सुरुवात केली आणि नंतर त्याने “कहेना उसे” ही कॅसेट आणली, उर्दू-मराठी डिक्शनरी आणली आणि त्यातल्या गझलचा अर्थ सांगण्यास सुरुवात केली. मेहदी हसन यांच्या एकसे एक गझल. आधी त्यातले संगीत फार हळूवार असल्यामुळे आवडले म्हणजे धून आवडल्या. अर्थ समजायला लागल्यावर डोळे उघडले आणि प्रचिती आली कि खरी गझल ती हीच...... खुली जो आंख तो........ तू आयुष्यात आलीस ते दिवस किती सुंदर होते. ते प्रेम, त्या आणाभाका....आयुष्यभर साथ न सोडण्याच्या. ते दिवस स्वप्नातीत होते....