खुली जो आंख तो …………
सहसा संगीतातला नवीन प्रकार ऐकायला आपली सुरुवात होते ती लोकप्रिय काय असेल ते कानावर पडल्यावर. गझलच्या बाबतीत माझेही असेच झाले...सिनेसंगीतामधील गझल ऐकल्या. अर्थमधील गाणी आवडली, उमराव जान सारख्या सिनेमातील काही शायरी समजायला लागली पण तो आपला प्रांत नव्हे असे वाटायचे. त्यानंतर निकाह चित्रपटामुळे गुलाम अली यांची ओळख झाली. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद ही गझल पॉझेस, तबल्याची साथ आणि एकूणच त्यामुळे होणारा माहोल यामुळे आवडली. नंतर माझा भाऊ सुधीर किर्लोस्कर याने गझल अभ्यासपूर्वक ऐकायला सुरुवात केली आणि नंतर त्याने “कहेना उसे” ही कॅसेट आणली, उर्दू-मराठी डिक्शनरी आणली आणि त्यातल्या गझलचा अर्थ सांगण्यास सुरुवात केली. मेहदी हसन यांच्या एकसे एक गझल. आधी त्यातले संगीत फार हळूवार असल्यामुळे आवडले म्हणजे धून आवडल्या. अर्थ समजायला लागल्यावर डोळे उघडले आणि प्रचिती आली कि खरी गझल ती हीच...... खुली जो आंख तो........
तू आयुष्यात आलीस ते दिवस किती सुंदर होते. ते प्रेम, त्या आणाभाका....आयुष्यभर साथ न सोडण्याच्या. ते दिवस स्वप्नातीत होते. शायर फरहत शहेजाद लिहितात, डोळे उघडले आणि बघतो तर काय? ती नव्हती, तो काळ नव्हता, एकटेपणा शिल्लक होता, फक्त फसाना शिल्लक राहिला होता. (फसाना या शब्दाला कहाणी म्हणणे जरा कठीण आहे, फसाना मध्ये जे माधुर्य आहे ते या शब्दात नाही). डोळे उघडले आणि स्वप्न संपले, सत्याची जाणीव झाली .....गमो ने बाट लिया....मी आता एकटाच आहे, आत्तापासून साथ सोडून गेलीस. साध्या कारणामुळे आपल्यात दुरावा आला आहे, आपल्याला आंतर खूप पार पाडायचे आहे...आपल्याला खूप मोठी मजल मारायची आहे, आपला साथ जन्मभराचा होणार होता......
खुली जो आँख तो वो था न वो ज़माना था
दहकती आग थी तनहाई थी फ़साना था
ग़मों ने बाँट लिया मुझे यूँ आपस में
कि जैसे मैं कोई लूटा हुआ ख़ज़ाना था।
सगळ्या दुःखांनी एकमेकात माझी वाटणी करून घेतलेली आहे, जसे काही मी कोणीतरी लुटून आणलेला खजाना होतो. माझ्या वाट्याला दुःख आलेले नाही, दुःखांच्या वाट्याला मी आलो आहे.
मेहदी हसन यांच्या आवाजात या ओळी ऐकतो तेव्हा तो दर्द आपल्याला समजतो. असहाय्य आशिक आपल्या डोळ्यासमोर येतो....दुःखात बुडालेला...दादरा ताल आवश्यक तेवदाच वाजतो.
ये क्या के चंद ही क़दमों पे थक के बैठ गए
तुम्हें तो साथ मेरा दूर तक निभाना था।
आपण आयुष्यभराचे सोबती होणार होतो. तू अशी काही पावलेच माझ्याबरोबर चालून लगेच थकलीस? तू तर माझ्याबरोबर खूप दूरवर साथ देणार होतीस....
“थक के बैठ गये” हे मेहदी हसन असे काही गातात कि तो थकवा आपल्याला जाणवतो. बासरी आणि सारंगीचे स्वर दर्दभरा माहोल उभा करतात तरीही प्राधान्य मेहदी हसन यांच्या स्वरानाच आहे.
मुझे जो मेरे लहू में डुबो के गुज़रा है
वो कोई ग़ैर नहीं यार एक पुराना था।
मला रक्ताच्या थारोळ्यात बुडवून कोण गेले हे असे मला एकटे टाकून ? ती कोणी अनोळखी व्यक्ती नव्हती.....दुश्मन नव्हता......माझीच तर जिवलग होती....घायाळ करून गेली ती....माझीच होती ती.
ख़ुद अपने हाथ से ‘शहज़ाद’ उसे काट दिया
कि जिस दरख़्त के तहेनी पे आशियाना था।
शेवटी तो म्हणतो.....तुझा दोष नाही, मीच जबाबदार आहे माझ्या या अवस्थेला ...ज्या झाडाच्या (दरख़्त) फांदीवर (तहनी) माझे एकट्याचे घर होते ती फांदी मी स्वतः माझ्या हातांनी कापून टाकली आणि माझ्या आयुष्यातली शांतता घालवून बसलो....स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्याचे दुःख आहे मला......मीच माझ्या आयुष्याची वाट लावली, तुझ्यावर प्रेम केले आणि तू मला सोडून गेलीस.....
ही गझल भंकर रागावर आधारित आहे. हा अनवट राग भैरव थाटातला आहे. लाइव्ह कार्यक्रमात मेहदी हसन या रागाचे स्वरूप उलगडून दाखवतात ते ऐकण्यासारखे आहे. या रागात रात्रीचे आणि सकाळच्या रागाचे स्वर एकत्र आहेत कारण रात्र संपत आहे आणि थोड्याच वेळात दिवस सुरु होणार आहे. खुली जो आंख यासाठी संगीतकार मेहदी हसन यांनी भंकर या रागाची केलेली निवड किती सार्थ आहे!!! त्यांनी लावलेला खर्ज ऐकण्यासारखा आहे......सकाळी आपला स्वर खर्जातलाच असतो.....बोलता बोलता हळूहळू आपण वरच्या पट्टीमध्ये प्रवेश करतो...संध्याकाळपर्यंत.
Mehdi Hasan Live - Khuli jo aankh
हीच गझल हरिहरन यांनी सुद्धा मेहदी हसन यांच्याच अंदाजात गायली आहे. तारी खां यांनी तबला साथ केली आहे. गझलमध्ये गायक जेव्हा धृपदाच्या ओळी पुन्हा गातो तेव्हा तबलावादन करता येते कारण आपल्याला त्या ओळी माहित असतात. तरीसुद्धा एकूण गझलचा भाव लक्षात घेता द्रुतमधील तबला वादन रसभंग करणारे ठरते. तो प्रियकर तिकडे जळतोय आतल्या आत....आणि तबला कसला वाजवताय द्रुत लयीत ? तिकडे दुर्लक्ष केले तर हरिहरन यांनी तो माहोल उभा केला आहे. हरिहरन यांनी सरगम फार सुरेख गायली आहे पण...... .......कौशल्य दाखवण्याची ही जागा नव्हे असे सारखे वाटत रहाते.
हीच गझल गुलाम आली यांच्या आवाजातही आहे. गुलाम अली यांनी गायलेल्या गझलेचा आणि शायरने व्यक्त केलेल्या दुःखाचा काही संबंध रहात नाही. या गझलेला लावलेली चाल ताल धरून डोलायला लावते, साथीला कि बोर्डवरील संतूर वाजते आणि एकूणच रंगाचा बेरंग होतो असे मला वाटते.
एक बस तू ही नहीं मुझसे ख़फ़ा हो बैठा
“कहेना उसे” याच आल्बम मधील दुसरी गझल शब्दार्थ लक्षात घेतला तर तितकीच किंवा त्याहून सरस आहे. स्वरांचा विचार करता ती संगीतकार मेहदी हसन यांनी मियां कि मल्हार रागात फार अप्रतिमरीत्या सजवली आहे. ही गझल ऐकताना नेहमी प्रश्न पडतो, गायकी ऐकावी कि शब्द.....त्यामुळेच आपण ती परत एकतो.....पुनःप्रत्ययाचा आनंद घेत रहातो. दादरा तालातल्या या गझलचा आस्वाद घेताना सतारीचे स्वर रुंजी घालतात.
या गझल मध्ये पहिले वाक्य ऐकल्यावर अर्ह समजत नाही, दुसरे वाक्य ऐकले कि पहिल्या वाक्याचे गांभीर्य समजते, त्याची तीव्रता लक्षात येते.....या गझल चा अंदाज वेगळा .आहे... भाऊ सुधीरकडून भावार्थ समजून घेत असताना तो म्हणाला ही गझल पूर्ण ऐकावी आणि नंतर अर्थ लावत ऐकावे. ती खफा आहे...... .....खफा म्हणजे फक्त रुसणे नाही …..रुसणे म्हणजे जीवनात नाही.....ती नसल्यामुळे मी मृत्यूशय्येवर आहे. आता त्याची तीव्रता अधोरेखित करताना शायर लिहितो.....मला चालता येत नाही, बोलता येत नाही....त्याची विदीर्ण अवस्थेत जाण्याची ही तीव्रता हळूहळू वाढत आहे...एकेक करत तो मृत्यू पावला....कसे?
शायर फरहत शेहजाद यांनी या गझलेत एकसे एक विरोधाभास पेश केले आहेत. शायर म्हणतात तू एकटीच नाहीस जी माझ्यावर रुसलेली आहेस, अगं तो प्रत्येक दगड जो मी कोरलाय तो देव होऊन बसलाय. मी दगड कोरायला सुरुवात केली, त्याचे शिल्प झाले आणि त्याचा देवच झाला त्यामुळे ती शिल्पे माझ्यापासून लांब गेली....तशीच तू.....माझी होतीस, माझ्यापासून लांब गेलीस....आपल्यातले अंतर वाढले. माझी मंझील म्हणजे माझे प्रेम स्वतः माझ्याजवळ आले तर बहुदा मी खुश होईन पण इथे वस्तुस्थिती अशी आहे कि माझ्या मंझीलपर्यंत पोहोचताना माझ्या पायाला फोड आले आहेत म्हणजेच ती मंझील दुरापास्त झाली आहे. पहिल्या कडव्यात ती दूर गेली, दुसऱ्या कडव्यात चालणे मुश्किल झाले, तिसऱ्या कडव्यामध्ये बोलता येईनासे झाले....अशा टप्प्या टप्प्याने आपुले मरण पाहिले म्या डोळा....
एक बस तू ही नहीं मुझसे ख़फ़ा हो बैठा
मैंने जो संग तराशा वो ख़ुदा हो बैठा
(तराशा – शिल्प, संग – दगड, संग तराशा – दगडाचे शिल्प)
देव होऊन बसला....चांगल्या अर्थाने वापरलेले नाही.....खुदा हो बैठा....म्हणजे माझा राहिलाच नाही...मोठे अंतर पडले....त्या दगडाने स्वतःला खुदा मानायला सुरुवात केली त्यामुळे तो माझा नाही राहिला.......देवानेही मला एकटे सोडले.....तू तर सोडणारच मला
उठ के मंज़िल ही अगर आए तो शायद कुछ हो
शौक-ए-मंज़िल तो मेरा आबलपा हो बैठा
(आबलपा – पायाला येणारे फोड....चालू शकत नाही)
मसलहत छीन ले कुवत ए गुफ्तार मगर
कुछ न कहेना ही मेरा, मेरी सदा हो बैठा
(मसलहत – चांगले झाले, भले झाले, गुफ्तार – बातचीत, सदा – पुकार)
मला आता बोलता येत नाही, बोलण्याची शक्तीच नाही राहिली, बोलण्याची शक्ती कुवत निघून गेली हे एक चांगले झाले, पण मी काही न बोलणे हाच माझा आवाज झाला.
शुक्रिया ऐ मेरे क़ातिल ऐ मसीहा मेरे
ज़हर जो तूने दिया था वो दवा हो बैठा
तू माझा कत्ल केलास, जे विष मला दिलेस तेच माझे औषध होते, मला या आयुष्यातून मुक्त केलेस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. जिच्यासाठी मी एवढ्या खस्ता खाल्या, माझी ही अवस्था अशी असहाय्य झाली आहे, तू जे केलेस त्यामुळे माझे आयुष्य संपत आहे, तेच विष ठरले..... आता मी निघून जात आहे, कायमचा....या वेदना संपतील माझ्या जाण्यानेच....नाहीतर असे तुझ्यासाठी झुरत जगण्यात काही अर्थ नव्हता....त्यामुळे तू दिलेले विष माझ्यासाठी अमृत झाले.....
जान-ए-शेहजाद को मीन-जुमला—ए-अदा पाकर
हुक वो उठी कि जी तन से जुदा हो बैठा
(जान-ए-शेहजाद- शेहजाद या शायराची प्रेयसी, मीन-जुमला—ए-अदा – उपकार करण्याच्या भावनेतून केलेल्या काही अदा, म्हणजे एक नजरेचा कटाक्ष टाकणे)
उपकार करण्याच्या भावनेतून तू माझ्याकडे असे काही पाहिलेस कि शायर म्हणतो प्रेयसीच्या या अदा पाहून ह्रदयात कळ आली आणि माझा प्राण हे कलेवर सोडून गेला.
मेहदी हसन यांनी लाइव कार्यक्रमात रागाचे स्वरूप आणि विशेषतः गंधार चा वापर सुरुवातीला विशद केला आहे.....हा गंधार अतिकोमल आणि तीव्रच्या दरम्यान आहे, तो हार्मोनियममध्ये सापडणे मुश्किल आहे. मेहदी हसन यांच्या सुरात सूर मिसळून उस्ताद सुलतान खां यांची सारंगी वाजते त्यामुळे गझलची खुमारी वाढते.
हीच गझल तितक्याच उत्कटतेने पण सुफियाना अंदाजात अबिदा परवीन यांनी गायली आहे. हे व्हर्जनसुद्धा जरूर ऐकावे. साथीला व्हायोलीनचे स्वर आहेत. सगळेच ऐकावे....तीन ते चार वेळा....आपली पाटी कोरी ठेवून....आधीची इम्प्रेशन्स बाजूला ठेवून ....मग संगीताचा आनंद अनोख्या पद्धतीने घेता येतो.
कोपलें फिर फुट आयी
कोपलें म्हणजे कळ्या झाडाच्या फांद्यांवर पुन्हा उमलू लागल्या आहेत, बहार आली आहे, वसंत ऋतू आला आहे, तिला सांगा जरा.....तिला समजणार नाही कि पुन्हा बहार येत आहे पण मी म्हणतोय म्हणून तिला सांगा.....
रूपक तालातील ही गजल, सतार वादनाने रंगतदार झाली आहे.
कोपलें फिर फुट आयी, शाख पर कहेना उसे
वो न समझेगा, मगर कहेना उसे
वक्त का तुफान हर इक शय बहा कर ले गया
इतनी तनहा हो गयी है रहगुजर कहेना उसे
काळाच्या ओघात सगळेच वाहून गेले....आपले प्रेम सुद्धा (शय). इतके कि सर्व रस्ता सुनसान झाला आहे, तिला सांगा जरा.....ज्या मार्गावर मी आहे तो मार्ग इतका वैराण झाला आहे कि त्यावर काळाने कोणत्याच खाणाखुणा ठेवलेल्या नाहीत. याआधी जे जे काही झालय ते सर्व विस्मरणात गेले आहे आणि तिच्या लेखी त्याला काहीही महत्व उरलेले नाही....याची तिला जाणीवही नाही....जरा तिला सांगा..
(रहगुजर – रस्ता )
जा रहा है छोड कर तनहा मुझे जिसके लिये
चैन ना दे पाएगा वो सीम-ओ-झर कहेना उसे
ज्याच्यासाठी मला एकटे टाकून तू सोडून चालली आहेस, त्याच्याकडे जड जवाहिऱ्यानी आलेली श्रीमंती असेल पण तो तिला माझ्यासारखे प्रेम देऊ शकणार नाही, कोणीतरी हे तिला सांगा.
(सीम-ओ-झर – चांदी हिरे जवाहर यामुळे आलेली श्रीमंती)
रीस रहा है खून दिल से लब मगर हसते रहे
कर गया बरबाद मुझको ये हुनर कहेना उसे
माझे हृदय विदीर्ण झाले (रक्तस्त्राव होतो...याचा भावार्थ) तरीही मी हसत राहिलो, मी तिच्याशी इतका चांगला वागलो, दुःख लपवत राहिलो आणि त्यामुळेच मी बरबाद झालो, आयुष्यातून उठलो, माझे दुःख तिला कधी समजलेच नाही, तीच माझ्या या बरबादीचे कारण बनली आहे....जरा सांगा तिला.
(रीस रहा है खून - रक्त वहात आहे, हुनर – कला, काबिलीयत, हुशारी)
जिसने जख्मो से मेरा शेहजाद सीना भर दिया
मुस्कुराकर आयी प्यारे चारागर कहेना उसे
(चारागर – डॉक्टर)
जिने माझ्या हृदयावर जखमा केल्या तीच डॉक्टर म्हणून हसत हसत आली, यापेक्षा शोकांतिका काय असू शकते?
कोपलें फिर फुट आयी, शाख पर कहेना उसे
वो न समझेगा, मगर कहेना उसे
संगीतकार – मेहदी हसन
हीच गझल क़व्वालीचे बादशहा नुसरत फतेह आली खां यांच्या आवाजात, वेगळ्या अंदाजात ऐकता येते.
कहेना उसे या आल्बम मध्ये अजूनही काही गझल आहेत पण आज तरी इथेच थांबतो. उर्वरित गझलचा आनंद परत कधीतरी. या गझल मेहदी हसन यांनी गायकी अंगाने शब्दाना महत्व देऊन त्यांच्या खास अंदाजात ऐकवल्या आहेत, त्या वेगवेगळ्या वेळेस विविध कारणांसाठी ऐकाव्यात, पुनःपुन्हा....एकदा शब्द समजण्यासाठी, शब्दार्थ समजल्यावर भावार्थ समजावा यासाठी, भाव समजल्यावर मेहदी हसन यांनी संगीतकार या नात्याने त्या शब्दाना चार चांद कसे लावले आहेत ते ऐकण्यासाठी आणि नंतर पुन्हा एकदा ऐकावे, मेहदी हसन यांची गायकी ऐकण्यासाठी.......असे ऐकले कि नादच लागतो.....कहेना उसे...
सुहास किर्लोस्कर
फारच सुंदर। खूप शब्दांचे अर्थ माहीत नव्हते। एकच गझल वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात ऐकून खूप छान वाटले। खूप बारकाव्यनिशी आपण पूर्ण लेख गझलेच्या इतकाच ताकतीने लिहिला आहे। धन्यवाद या अनवट लिखाणाबद्दल।������������������
ReplyDeleteअतिशय अभयासपूर्ण लेख. खूप नवीन माहिती मिळाली व पैलू सुध्दा कळाले. लिखते रहीये
ReplyDeleteऱिस ह्या शब्दाचा अर्थ राग बरोबर आहे का ?
ReplyDeleteरिस रहा है खून म्हणजे रक्त येणे
धन्यवाद ...दुरुस्त केले
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteबरोबर
Deleteमाझ्या अंदाजाप्रमाणे...
"रिस रहा है", म्हणजे "टपक/गिर/बह रहा है",
धन्यवाद सुहसजी . मेहदी हसन। यांच्या गाण्यांचा खूप छान परिचय करून दिलात .
ReplyDeleteप्रारंभीची काही वर्ष मी गुलाम अली यांचाच डाय हार्ड भक्त होतो .वेरूळ अजिंठ्याची लेणी दहा वेळा पहिली तरी अकराव्या वेळी काहितरी नव्याने जाणवते .प्रत्येक वेळी आपली जाणीव समृद्ध होत राहते .गुलाम अली यांच्या गजलाही कितीही वेळा ऐकल्या तरी पुन्हा ऐकताना नव्याने ऐकल्याचा आनंद देतात .पण एके दिवशी नेटवर गाण्याखाली दर्दी रसिकांच्या अभिप्रायात गुलाम अली आणि मेहदी हसन यांची तुलना होती आणि त्यात मेहदी हसन यांच्या स्वर्गीय गजलांचे भक्तिभावाने केलेले वर्णन होते .योगायोगाने त्यांची "अब के हम बिछडे .. " हीच गजल सर्वात पहिल्यांदा ऐकली .आणि पहिल्या प्रेमा प्रमाणे मनात तिचे आणि मेहदी यांच्याविषयी अढळ स्थान निर्माण झाले .नुसरत फतेह अली यांची खड्या आवाजातली विलक्षण देह बोली , झपाटणारा ठेका याचाही अनुभव घेतला .पण माझ्या बालबुद्धीने मेहदी यांनाच हृदयात पहिले स्थान दिले .त्यांच्या अनेक गजला नंतर पुन्हा पुन्हा ऐकल्या . बऱ्याच वेळा रात्री (जमल्यास बेरात्री ) आस्वाद घेतो, त्याचवेळी आपण त्यांना न्याय देऊ शकतो असे वाटते .जुनी झुक झुक गाडी अप रात्री कुठे तरी बिन चेहऱ्याच्या फलाटावर थांबलेली असते .आपण पृथ्वीवर आहोत याचा कोणताही संदर्भ आसपास नसतो .यावेळी हेतुशून्य अवस्थेत आकाशातले चांदणे पाहताना एक निर्विकार पारलौकिक भावना निर्माण होते .असा अनुभव फक्त मेहदी हसन यांची गजलच देऊ शकते .🙏🏼
खूप सुंदर लेख! गझल 'समजू' लागली की आपण एका वेगळ्याच भावविश्वात जातो याचा थोडा फार अनुभव मी घेतलाय, पण मी त्याबाबतीत अजून खूपच मागे म्हणजे अगदी प्राथमिक पेक्षा ही मागच्या अवस्थेत आहे! तुमचा लेख वाचून 'गझल' प्रकाराचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली ! आता हा उपक्रम कसा तडीस जातो ते बघू....
ReplyDelete30 वर्षापुर्वी डॉ. विनय वाईकर यांचे लेख आणि इतरही साहित्य वाचून ग.. ज.. ल... 'समजली' होती. पण आज इतक्या वर्षांनी ती 'उमजली'. आपला आभारी आहे. एक विनंती की आपल्या ब्लॉग वर कायमस्वरूपी सदस्यत्व द्याल का . आपला एक ही लेख वाचायला न मिळणे... हेच वाईट होईल माझ्यासाठी. म्हणून कृपया सोय करावी ही पुनश्च विनंती. आणि आभार.
ReplyDeleteक्या बात है,
ReplyDeleteअप्रतिम शब्दांकन.. !