लक्ष्मीकांत प्यारेलाल – राजन साजन मिश्रा यांचा सूर संगम



कॉलेजमध्ये असताना लक्ष्मीकांत प्यारेलाल हे माझे आवडते संगीतकार होते.  त्यांची गाणी तेवढ्या काळापुरती तरी लोकप्रिय असायची.  त्यांचे पॉझेस, ओर्केस्ट्रेशन, व्हायोलीनचा वापर असे बरेच काही.  राजेश खन्ना-जितेंद्रचे काही सिनेमे फक्त लक्ष्मी-प्यारे यांच्या गाण्यासाठी बघितले होते.  याच काळात सूरसंगम हा वेगळा सिनेमा आला आणि त्यातल्या गाण्यांचे वेगळेपण लक्षात आले.  तेव्हा ही गाणी वेगळी वाटली पण नेमकी का आवडतात हे सांगता येत नव्हते.  नंतर शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाल्यावर सूरसंगम या चित्रपटाची गाण्यातले सौंदर्य लक्षात आले.  चित्रपट पुन्हा पाहिला.  शंकरभरणम या तेलुगु चित्रपटाची रिमेक असलेल्या या चित्रपटाची गाणी एक से बढकर एक आहेत.  लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या दर्जेदार चित्रपटापैकी एक.  एक दुजे के लिये, चरस, दोस्ती, कर्मा वगैरे चित्रपटातले लोकप्रिय लक्ष्मी-प्यारे वेगळे आणि चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे सांगीतिक दर्जा उंचावणारे उत्सव, सूरसंगम चित्रपटाचे लक्ष्मी-प्यारे वेगळे.  अशाच वेगळ्या गाण्यांचा हा मागोवा....




आयो प्रभात सब मिल गाओ 
गीतकार वसंत देव यांनी लिहिलेले हे गीत भटियार रागावर आधारित आहे.  राजन साजन मिश्रा यांनी अतिशय भावपूर्ण गायले आहे.  एस जानकी यांनी समर्थ साथ दिली आहे.  भटियार रागातील ताना, टाळ, आद्धा तीनताल सारेच सुरेल.  कदाचीत दीड मिनिटाचे गाणे असल्यामुळे रेडियोवर ऐकवले जात नसेल त्यामुळे लोकप्रिय झाले नसावे.  




दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी सूरसंगम फार सुरेखरीत्या दिग्दर्शित केला आहे.  कामचोर, जाग उठा इन्सान, सरगम, ईश्वर, संगीत अशा चित्रपटासाठी हा दाक्षिणात्य चित्रपटांचा महान दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीच्या ओळखीचा झाला.  अर्थात त्यांनीच दिग्दर्शित केलेला मूळ शंकरभरणम हा तेलुगु चित्रपट अधिक दर्जेदार असेलही पण दोन्ही चित्रपटातील गाणी ऐकल्यावर मला तरी हिंदी गाणी अधिक आवडली.  गाजलेल्या चित्रपटाची रिमेक करताना तितक्याच किंवा त्याहूनही अधिक सुंदर गाणी संगीतबद्ध करण्याचे शिवधनुष्य लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी लीलया पेलले आहे.  

हे शिवशंकर, हे करुणाकर, परमानंद महेश्वर 


वसंत देव यांच्या गीतामध्ये गुरूचा  समर्पण भाव आणि शिवभक्ती यांचा संगम आहे.  एका गुरूची वैफल्यग्रस्त भावना फार सुरेखरीत्या प्रकट झाली आहे.  शास्त्रीय संगीत गायक राजन-साजन मिश्रा यांनी सर्वच गाणी भावपूर्ण रीत्या गायली आहेत.  गिरीश कर्नाड यांचा अभिनय अप्रतीम, विशेषतः गायक या नात्याने गाणी त्यांनीच गायली आहेत असे वाटते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सिनेसंगीतातील नाट्य फार सुरेखरीत्या उभे केले आहे.  कडव्यामधील शब्द तिश्रमध्ये गायल्यामुळे वेगळा परिणाम साधला आहे.  

पंडित शिवशंकर शास्त्री (गिरीश कर्नाड) भारतीय शास्त्रीय संगीताचे उपासक आणि श्रेष्ठ गायक आहेत पण काळानुसार त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा असणारे शिष्य कमी होतात, संगीत बदलत जाते.  त्यांची शिष्या तुलसी (जयाप्रदा) कौटुंबिक कारणामुळे गाणे शिकू शकत नाही परंतु तिच्या मुलाला शास्त्रीजी यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवते....

जांऊ तोरे चरण कमल हे भूप रागावर आधारित गाणे राजन साजन मिश्रा आणि  लता मंगेशकर यांनी गायले आहे.   

गिरीश कर्नाड यांचे भाव बघावे कि गाणे ऐकावे हा प्रश्न पडतो.  गाण्यातील सरगमचा वापर संतूर, जलतरंग, बासरी, सतार, मृदंग आणि पौझेस यांचा फार उत्तम वापर केल्यामुळे गाणे अधिक श्रवणीय झाले आहे.   
जांऊ तोरे चरण कमल परवारी 
हे गोपाल गोविंद मुरारी, 
शरणागत हुं द्वार तिहारी....
कितना घना बना अंधियारा
घुलता मै, सारा का सारा
तू ही मेरा एक आधार (हा एकमेव शिष्य उरला आहे या अर्थाने) 
शरणागत हुं द्वार तिहारी...
जयाप्रदाचे नृत्य आणि त्याच वेळेस टाळ दाक्षिणात्य संगीताच्या अंगाने वाजते आणि गाण्याचा माहोल बनतो.  जयाप्रदा आपल्या मुलाकडून गाणे ऐकते आणि कृतकृत्य होते अशा प्रसंगाचे जयाप्रदाने सोने केले आहे.  

आये सूर के पंछी आये" हे गाणे म्हणजे राजन साजन मिश्रा यांचे स्वर आणि गिरीश कर्नाड यांचा अभिनय याची जुगलबंदीच जणू.  

आये सूर के पंछी आये हे
अंबर के ओंकार नाद कि गुंज सुनाने आये 
किरणो कि अवरोह राह से धरती पर उतराए 
माटी को छु कर जिने कि चाह जगा दे 
आये सूर के पंछी आये हे


राग मालकंसवर आधारित गाण्याची मैफल सुरु असतानाचा प्रसंग बघण्यासारखा आहे.  हा प्रसंग चित्रपटातील आहे त्यामुळे वेगळा वाटेल पण संगीत समारंभात हे चित्र दिसते.  स्वरमंचावर कलाकार कला सादर करत असताना प्रेक्षागृहात कसे जावे, कोणालाही त्रास होणार नाही असे वागावे याचे कोठेही प्रशिक्षण दिले जात नाही तरीही common sense is not common याचे प्रत्यंतर बऱ्याच संगीत समारंभात येते.  कार्यक्रम सुरु असतानाही स्टेजपुढून ये जा करणारे रसिक कलाकाराची बिलकुल तमा बाळगत नाहीत हे फार उद्वेगजनक आहे.  

चित्रपटातील सर्वच गाण्यात गिरीश कर्नाड गात आहेत असाच फील देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  फार उत्तम अभिनेता असूनही हिंदी चित्रपटसृष्टीने त्यांची कदर केली नाही असे वाटते.  सूर का सोपान है सुरीला हे तीनतालातले गाणे गुरु आणि शिष्य यांच्यातील शिकण्याची प्रक्रिया आहे.  आये सूर के पंछी आये या गाण्याचा पुढील भाग ऐकण्यासारखा आहे.  राजन साजन मिश्रा आणि कविता कृष्णमुर्ती यांचे स्वर बराच वेळ आपल्या कानात रुंजी घालतात. . 


सूरसंगम सारखे चित्रपट कोणत्याही टिव्ही चॅनेलवर बघायला मिळत नाहीत.  क्लासिक चित्रपट दाखवणारा  टिव्ही चॅनेल अस्तित्वात नाही. सूर्यवंशम प्रत्येक आठवड्यात दाखवतील पण दर्जेदार चित्रपट दिसणे मुश्किल आहे.  त्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतील.  अर्थात हा चित्रपट यु ट्यूबवर उपलब्ध आहे ही एक चांगली बाजू. 

साध रे मन सूर को साध रे 
सारंगी च्या स्वरांनी हे गीत सुरु होते, कर्नाटकी बाज परिणामकारक आहे.  मृदंग, तबला, व्हायोलीन, सरोद, – राजन साजन मिश्रा यांचे स्वर, सरगम, कर्नाटकातील हळबीड-बेलूर येथील मंदिराच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेले जयाप्रदाचे नृत्य या सगळ्याची जुगलबंदीच. 
साध रे मन सूर को साध रे 
एक मन को दुसरे से बांध रे 
तान है सुरज किरण, आलाप नीलम का गगन
अब मुझे अंकुर धरा पर,  बांध ऐसा राग रे

मेघ से मल्हार ले, गंध से गंधार ले तू 
घोर पंचम कोकिला का, तू बहा लो राग रे 

अशाच एकापेक्षा एक सरस गाण्यात कलावती रागावर आधारित मै का पिया बुलावे या गाण्याने या सिनेमात वेगळीच खुमारी आणली आहे.  लता मंगेशकर  यांच्या स्वरांनी आद्धा तीनतालात सुरुवात होते.  सतार, तबला-तरंग, जलतरंग, बासरी, सरोद, मृदंग यांनी सजलेले गाणे सुरेश वाडकर यांच्या आवाजात संपते.  कलावती रागातील landmark गाणे म्हणून या गाण्याचा उल्लेख करता येईल.   मदन गुनगुनाए हे शब्द सुरेश वाडकर यांच्या आवाजात ऐकायला विचित्र वाटते, जरी तांत्रिकदृष्ट्या त्यांनी बरोबर गायले असले तरीही गाण्यातल्या अभिनयात ते कमी पडतात असे मला वाटते.  




प्रभू मोरे अवगुण चीत ना धरो हे एस जानकी यांनी गायलेले तसेच  साधो ऐसा ही गुर भावे – राजन साजन मिश्रा, अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गाणेसुद्धा उल्लेखनीय आहे.  

माझी रे माझी रे हे सुरेश वाडकर यांनी गायलेले एक गाणे खरे तर चित्रपटात शोभत नाही.  सुरेश वाडकर यांच्या गाण्यात अभिनय कमी आणि सुरेश वाडकर जास्त दिसतात.  महागुरू सचिन पिळगावकर अत्यंत विचित्र पद्धतीने नाचले आहेत त्यामुळे या गाण्याबद्दल अधिक न लिहिलेले बरे.   



एकूणच चित्रपटात गिरीश कर्नाड, जयाप्रदा यांचा अभिनय विलक्षण.  पेंटल यांनी तबलासाथ करताना निदान काही बोल जरी तालावर वाजवले असते तरी गाणे बघताना बहार आली असती.  अर्थात गिरीश कर्नाड यांनी सर्व कसर भरून काढली आहे.  महागुरू बनण्यापूर्वीचा सचिन असल्यामुळे सुसह्य आहे.  महागुरू यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर गिरीश कर्नाड सचिनला ज्युनियर आहेत!!!  तरीही सचिन यांनी थोडा अभिनय अशा ज्युनियर (?) अभिनेत्यांकडून शिकला असता तर सचिन सिनियर असल्याचा चाहत्यांना अभिमान वाटला असता.  

धन्य भाग सेवा का अवसर पाया हे भैरवी  रागावर आधारित गाणे राजन साजन मिश्रा आणि कविता कृष्णमुर्ती यांनी गायले आहे.
  

धन्य भाग सेवा का अवसर पाया
चरणकमल कि धूल बना मै
मोक्षद्वार तक आया 

भजनी ठेक्यावर हे गाणे बेतलेले आहे.  विणेचा चपखल वापर कर्नाटक संगीत ऐकण्याचा फील देते.  गायकाला खोकला येतो हा टिपिकल भारतीय चित्रपटात दिसणारा प्रसंग गिरीश कर्नाड, जयाप्रदा आणि बालकलाकार आकाश सिंग यांनी उठावदार केला आहे.  ही भैरवी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.  अर्थात याचे श्रेय अभिनेते, दिग्दर्शक के विश्वनाथ आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल याना जाते.  राजन साजन याना यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीत गाणी का दिली गेली नाहीत हे एक कोडेच आहे......न उलगडणारे.  


सुहास किर्लोस्कर



Comments

  1. Sir, excellent piwce. Would love to read a write-up on music of sargam and utsav .

    ReplyDelete
  2. शंकराभरणम आणि सूर संगम दोन्ही उत्तम आहेत।लेख मस्त

    नितीन शुक्ल

    ReplyDelete
  3. खुप श्रवनिय संगीत,गायन, कलाकारांनी केलेला अभिनय यांचे केलेलं समीक्षन सुरसंगम पहात आहोत असे वाटते

    धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  4. चित्रपट संगीताचे ओघवत्या भाषेत केलेले रसग्रहण,खास किर्लोस्करी शैलीत.वा फारच छान.

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख आणि प्रथमच सगळी गाणी एकत्रितपणे समजून घेऊन ऐकली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे अनमोल योगदान,, गिरीश कर्नाड जयाप्रदा यांचा अविस्मरणीय अभिनय राजन साजन मिश्रा ह्यांनी अर्वणीनीय गायन केले आहे घन्यवाद सुहासजी गेला एक तास पुर्ण पणे संगीत मय केलात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास