राग, थाट गट आणि संगीत अभ्यास
राग, थाट गट आणि संगीत अभ्यास - राजीव साने
शब्दांकन
- सुहास किर्लोस्कर
गाता रहे मेरा दिल हा उपक्रम सुरु करून 2
वर्षे झाली. Music appreciation, अर्थात संगीत समजून ऐकणे या उद्देशाने
दरमहा एक कार्यक्रम सादर केला जातो.
कार्यक्रम क्र 30 श्री राजीव साने यानी सादर केला.
श्री राजीव साने वेगवेगळ्या विषयाचा खोलात जाऊन
तपशिलासह अभ्यास करतात आणि त्यावर स्वतः विचार करून मांडतात. गल्लत गफलत गहजब ही लेखमाला आणि त्यावरचे
पुस्तक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
त्यानीं गीतेचा अभ्यास करून त्यातील श्लोकातील विरोधाभास यावर सविस्तर
विचार मांडलेले आहेत. भारतीय शास्त्रीय
संगीताचे ते अभ्यासक आहेत. व्हायोलीन
शिकल्यावर त्यानीं स्वर-राग-थाट याबाबत स्वतंत्रपणे विचार केला हे महत्वाचे. अन्यथा आपल्याकडे गुरुने दाखवलेल्या वाटेवरच
चालण्यात धन्यता मानली जाते. वेगळा विचार करणे गुरूलाही पसंत पडते असे नाही
त्यामुळे तसे शिष्य निर्माण होणे तेवढेच दुर्लभ.
श्री राजीव साने यांच्याकडून एखादा विषय कसा
शिकावा याचा धड़ा मिळाला हे महत्वाचे. 3
तासाच्या कार्यक्रमात रसिकांच्या प्रश्नानाही त्यानीं उत्तरे दिली आणि कार्यक्रम
रंगत गेला, त्याचा थोडक्यात वृत्तांत -
राग
उत्तर भारतीय संगीतामधे रागांचे अस्तित्व 2
प्रकारचे आहे
Normative prescriptive - नियम आणि त्याचा पुरस्कार म्हणजे कसे
पाळावे हे ठरवून दिलेले असते. प्रत्येक
राग हा नियम संच असतो. ते राग शास्त्रीय, उपशास्त्रीय, सिने संगीतात,
भावगीतात
वापरत राहिल्याने त्या रागांची स्मृती रसिकांच्या मनात कायम रहाते, त्याची
एक परंपरा निर्माण होते, चालू रहाते. रागाचे व्याकरण आणि राग जाणवणे या दोन वेगळ्या
गोष्टी आहेत.
रागाच्या नियमांचा पहिला प्रकार म्हणजे वर्ज्य
अवर्ज्यतेचे नियम. एकूण स्वर 12
आहेत पण त्या स्वराना नावे सातच आहेत, हा मुख्य प्रश्न आहे. 12 स्वर सलग वाजवण्याला काहीही सौंदर्य
नाही, त्यातील काही स्वर न घेण्याला सौंदर्य असते. सा रे ग म ध नी अशा सात स्वरांपैकी "रे ग
ध नी" यांना कोमल स्वर पण आहेत आणि "म" तीव्र आहे त्यामुळे
"रे ग म ध नी" अशा 5 स्वरात 2 शक्यता निर्माण
होतात. अशा या 12 स्वराना 12
नावे असती तर त्यापैकी कोणते स्वर वर्ज्य करायचे एवढे सांगावे लागले असते, थाट
करावे लागले नसते. तसेच कोमल/तीव्र स्वर म्हणजे
ऐकायला कोमल/तीव्र असे काहीही नाही.
कोमल/तीव्र, शुद्ध/तीव्र म्हणजे खालचा आणि वरचा स्वर असे
म्हणता येईल.
थाट
7 अधिक 5 स्वरांची combination व्यक्त
करण्यासाठी वर्गीकरण आले आणि थाटाची निर्मिती झाली. "रे ग ध नी" कोमल की शुद्ध आणि म
शुद्ध की तीव्र हे सांगण्याची पध्दत म्हणजे थाट.
या सगळ्याची combination बरीच करता येतात. रागात एकच स्वर कोमल असु शकतो आणि शुद्ध असु
शकतो. हे थाट 10 आहेत असे पुस्तकात लिहिलेले असते पण हे थाट
पुरेसे नाहीत असेही पुस्तकात लिहिलेले असते. याचे कारण सर्व combination करून
पाहिली तर 72 होतात पण सांगीतिक दृष्टया त्या सगळ्या 72
थाटांचा उपयोग नाही. तर असे उपयोगी असलेले
25 राग घेतले आणि त्यांचे वर्गीकरण राजोव साने यानी केले.
सगळे वरचे स्वर घेतले तर कल्याण थाट होतो असे
सांगितले गेले आहे. पण यात असे खुप राग
आहेत ज्याना कल्याण थाटात वर्गीकरण करणे योग्य नाही. उदाहरणार्थ शुद्ध आणि तीव्र
असे दोन्ही म असलेले स्वर सुद्धा कल्याण थाटात वर्गीकृत केले हे योग्य नाही असा
विचार राजोव साने यानी मांडला. तर अशा दोन
म असलेल्या रागाना बिहाग थाट असे नामकरण त्यानीं केले - बिहाग, नट,
छायानट,
हमीर,
गौड़
सारंग, शाम कल्याण, केदार, कामोद, शुद्ध
सारंग, शंकरा, हंसध्वनि असे राग त्या थाटात वर्गीकृत
केले. मुळ कल्याण थाटात अमृतवर्षिणि,
मारूबिहाग,
हिंडोल,
यमनकल्याण,
राजकल्याण,
प्रभातकल्याण,
वैजयंती,
यमनी
बिलावल, यमनपहाडी येतात. अशा प्रकारे
थाट वाढत जातात.
खमाज थाट म्हणजे नी कोमल अशी व्याख्या पुस्तकात
आहे. परंतु खमाज प्रकारातील जे राग आहेत
त्यात आरोहात नी शुद्ध आहे आणि अवरोहात नी कोमल आहे. खरे तर खमाज थाटात दोन्ही नी
असणे आवश्यक आहे. देस, तिलंग, सारंग असे राग 2 नी असणारे
आहेत. त्यामुळे अशा रागांचा वेगळा गट करणे
आवश्यक आहे असा विचार श्री राजीव साने यानी मांडला. फक्त कोमल नी असणारे राग वेगळ्या गटात घेणे
आवश्यक आहे. उदाहरणार्थ कलावती म्हणू
शकतो.
अशाच प्रकारे बिलावल हे थाटाचे नाव बरोबर नाही,
कारण
बिलावल मधें क्वचित सगळे स्वर शुद्ध असतात.
त्याचाही असाच वेगळा विचार करावा लागेल.
अल्हैय्या बिलावल हा या बिलावल थाटातील मुख्य राग खमाज थाटात घ्यावा
लागेल. बिलावल हे थाटाचे नाव सुद्धा
बरोबर नाही, त्याला मांड थाट म्हणता येईल.
रागांचा दूसरा नियम म्हणजे स्वर कसा घ्यायचा
आहे, निसटता घ्यायचा आहे की त्याच्यावर ठेहेराव द्यायचा आहे, त्या
स्वरानी ती phrase संपवायची की नाही, कोणत्या
स्वरांवर शेवट करणे आवश्यक आहे, याने रागाचे स्वरूप ठरते, बदलते.
भारतीय शास्त्रीय संगीतामधे गाण्याची, ऐकण्याची परंपरा आहे तशीच व्याकरण
करण्याचीही परंपरा आहे.
ओडव म्हणजे पाच स्वरांचा राग, षाडव
म्हणजे सहा स्वरांचा आणि संपूर्ण राग हा सात स्वरांचा असतो. पण गौड सारंग राग
संपूर्ण पेक्षा अधिक आहे असे म्हणता येईल कारण त्यात सातपेक्षा अधिक स्वर
आहेत. काही राग ओडव अंग प्रामुख्याने
घेतले जातात त्याचे वेगळे वर्गीकरण करता येते. उदाहरणार्थ वृंदावनी सारंग राजीव
साने यांच्या वर्गीकरणाप्रमाणे खमाज
थाटातला "रे म प नी" ग्रुप मधला राग आहे. देस आरोहात वृंदावनी सारंगासारखा असला तरी
अवरोहात वेगळा आहे. असा विचार का करायचा
हे सुद्धा राजीव साने यानी विषद केले, कोणता राग कोणाच्या जवळचा आहे हे असा
अभ्यास केला तर समजते. एका रागापासुन दुसऱ्या रागातील अंतर समजायला या थाट-गट
वर्गीकरणाने मदत होते.
भूपचा ध कोमल केल्यामुळे भूपेश्वरी राग होतो -
मालवून टाक दीप
अबके हम बिछड़े
चढ़ता सूरज धीरे धीरे
ही गाणी त्याच रागावर आधारीत आहेत.
भूप मधें ग कोमल केला की शिवरंजनी होतो. यात असंख्य गाणी आहेत -
जाने कहां गए वो दिन
मेरे नैना सावन भादो
रे ग ध तीन ही स्वर कोमल केले की भूपाली तोड़ी
होतो. थाट गट वर्गीकरण असे राग समजून
ऐकण्या/शिकण्यासाठी उपयोगी ठरते.
"ग म ध नी" याचा असाच गट करता येतो. कौशिक रंजनी आणि चंद्रकंस या रागात काय फरक
सांगता येईल ? चंद्रकंसमधें मोकळा रे मध्य सप्तकात लावला
जातो.
याशिवाय काही राग सरळ नाहीत म्हणजे सरळ
आरोह-अवरोह सरळ जात नाहीत, काही वक्र रागात अवरोहात येण्याचे स्वर
वेगळे आहेत. अर्थात हे सर्व राजीव साने
यानी हार्मोनियमवर सांगितले, सप्रयोग सादर केल्यावर समजले.
अशा प्रकारे केलेले रागांचे सविस्तर वर्गीकरण
सोबत जोडलेल्या pdf फाईल मधें बघू शकतो. हा राजीव साने यानी केलेला
प्रयत्न आहे. तो परिपूर्ण आहे असा त्यांचा दावा नाही पण अभ्यास करायला सोयीचे
जाईल.
त्यानीं काही बंदिशी लिहिल्या आहेत ज्यामधे
रागाचा भाव आणलेला आहे. मला असे वाटते की आता "सासवा-नणंदा"
यांच्याभोवती फिरणाऱ्या बंदिशीपेक्षा काल-राग-भाव सुसंगत बंदिशी गायल्या जाव्यात.
देसकार रागात राजीव साने यांची बंदिश -
भोर आयी, जाग उठे
नवचेतन की फुहार लूटे
गत दिनों के सब कष्ट मिटत और
गत किल्मीश का तिमिर हटे
श्री साने यानी याव्यतिरिक्त tempered
scale - वेगवेगळ्या रागातील म हा वेगळा लावला
जातो असे मुद्दे सुद्धा समजावून सांगितले. त्या स्वरांचे गणितसुद्धा समजले,
अर्थात
तो वेगळा विषय असल्यामुळे त्याबद्दल सविस्तर नंतर कळवता येईल. या नंतर श्री राजीव साने यानी विविध प्रश्नाना
उत्तरे दिली, त्यात मूर्छना सारखे विषयसुद्धा समजले.
आला ग बाई आला ग
आणि
आनंदाचे डोही आनंद तरंग
ही दोन्ही गाणी धानीकंस रागावर आधारीत आहे हे
समजले.
त्यानीं एकच गाणें वेगवेगळ्या रागात कसे गाता
येते हे सप्रयोग सांगितले. कोणत्याही गाण्याची नोटेशन्स सांगण्याची कला त्यानीं
अवगत केली आहे. "आजा सनम मधुर चांदनी में हम" यासारख्या गाण्याची
नोटेशन्स त्यानीं लिलया सांगितली.
प्रत्येक गोष्टीचे व्याकरण अभ्यासपूर्वक बघणे
हा राजीव साने यांचा छंद आहे पण प्रत्येकाने संगीताचा अभ्यास तसाच करावा असा
त्यांचा आग्रह नाही. संगीताचा आनंद आणि
समजून ऐकल्यावर होणारा intellectual आनंद दोन्ही प्रकारे घेता येतो,
ते
एखादे प्रमेय सुटण्यासारखे आहे, आपल्याला माहित असल्याप्रमाणे सम घेतली
तर आनंद आहे, नवीन पद्धतीने सम घेतली तर अनपेक्षित घडल्याचा
आनंद ही आहे. संगीत समजून ऐकण्याचा नाद
लावल्याबद्दल आणि एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ घालुन
दिल्याबद्दल श्री राजीव साने यांचे पुनश्च आभार.
Comments
Post a Comment