“राग सरिता” च्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये गुनिजान चर्चा
“राग सरिता” च्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये गुनिजान चर्चा
पंडित सी आर व्यास यांचे शास्त्रीय संगीतामधील योगदान मोठे आहे. गायनाव्यतिरिक्त त्यांनी अनेक बंदिशी गुनीजान नावाने लिहिल्या तसेच अनेक रागांची निर्मितीसुद्धा केली. धैवत नसलेला आणि कोमल निषाद असलेला कल्याण म्हणजे धनकोनी कल्याण राग पं सी आर व्यास यांना रियाज करताना सुचला. गुनीजान या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशीवर "राग सरिता" या संस्कार प्रकाशनद्वारे निर्मिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांचे सुपुत्र सुहास, सतीश आणि शशी व्यास यांनी आयोजीत केला. उस्ताद झाकिर हुसेन यांनी पं व्यास यांना पूर्वी तबलासाथ केली आहे आणि काही गुनीजान बंदिशीची त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते प्रकाशन होणे समयोचित होते.
झाकीर हुसेन यांनी सांगितले "भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितले आहे की "रंगती इति रागः" (that colours your mind). रागांचे सौंदर्य बंदीशींच्या रूपाने पं सी आर व्यास यांनी खुलवले, त्यामध्ये रंग भरले आणि सुहास व्यास यांच्या प्रयत्नामुळे ते पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सी आर व्यास याना तबलासाथ करताना मला वाटायचे कि आपल्यालाही यांच्यासारखा संगीतामधला निखळ आनंद घेता आला पाहिजे. बंदीशींच्याबद्दल बोलण्याची माझी योग्यता नाही. सत्यशील देशपांडे याबद्दल प्रभुत्वाने बोलू शकतात. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर आम्ही वन डे, 20-20 चे खेळाडू आहोत. पं सी आर व्यास, सुरेश तळवलकर, सत्यशील देशपांडे यांच्यासारखे कलाकार टेस्ट मॅचचे खेळाडू आहेत जे मेहनत घेऊन डॉक्युमेंटेशन करून कला जतन करण्याचे महान कार्य करत असतात."
राग सरिता म्हणजे रागांचा आणि बंदिशींचा हा प्रवाह नव्या पिढीकडे जावा या उद्देशाने पं व्यास यांनी लिहिलेल्या बंदिशी पुस्तकरूपाने सर्वांसाठी उपलब्ध झाल्या. व्यास यांनी रचलेल्या प्रत्येक बंदिशीमध्ये एक विचार दिसतो. बंदिशीमध्ये त्यांनी आकर्षकता आणली. रागाच्या गुणधर्मानुसार बंदिशी बांधल्या. तो विचार त्यांना त्यांचे गुरू गुणीदास यांनी दिल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. पं सी आर व्यास यांनी गुरूंकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघून त्यांची विविध रूपे बंदिशीच्या रुपात दाखवली. त्यांचे गुरू जगन्नाथबुवा पुरोहित उर्फ गुणीदास यांचे वर्णन शिष्य सी आर व्यास यांनी दुसऱ्याचे गुण जाणणारा म्हणजेच गुनीजान असे केले आणि बंदीशीमध्ये या रूपाने गुरूचा अंतर्भाव केला.
गुंज रही किरत तुमरी
चहूं ओर संगीत जग में
अतुल नाम पायो है
जान गुनिदास अभिदान
जगन्नाथ के
जुग जुग जियो हो
मोरे मन भायो है
सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास असणारे आणि बंदीशींवर प्रभुत्वाने बोलू शकणारे व्यक्तिमत्व अशी ज्यांची यथोचीत ओळख सुहास व्यास यांनी करून दिली त्या पं सत्यशील देशपांडे यांनी सांगितले की "60 ते 80 च्या दशकातल्या 5 उत्तम रचनाकारांमध्ये सी आर व्यास यांचे नाव घ्यावे लागेल. आपले संगीत भारताच्या दोन तृतीयांश भागात गायले गेलेले आहे. राग आणि ताल तोच असला तरीही भौगोलिक आणि सामाजिक कारणांमुळे प्रत्येकाचा मिजाज वेगळा असतो. संगीतामध्ये या सगळ्याचा तोल सांभाळून सौंदर्य टिकवण्याचे काम प्रत्येक पिढीमध्ये कोणी ना कोणी केले आहे. आग्रा घराण्यांमध्ये बोलतान-युक्त गाणे जोशात गायले जात होते तेव्हा उस्ताद आमिर खां यांचा प्रवेश झाला आणि त्यामुळे विलंबित ख्याल गायनाचे महत्व श्रोत्यांना समजले. नाट्यसंगीतामध्ये सुद्धा बालगंधर्वांच्या गायनाच्या कालावधीत मा. दीनानाथ मंगेशकर आले, ज्यांच्या गाण्यांचा वेगळा लहेजा वेगळा होता आणि त्यातले सौंदर्य याचे महत्व लोकांना उमगले. मेहदी हसन आणि गुलाम अली यांच्या गायकीबाबतीत असेच सांगता येईल. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी गाण्यात वेगळा विचार मांडला आणि सी आर व्यास यांनी तो विचार पुढे नेला. जणू काही विमान आकाशात उंच भरारी मारण्याचे काम जगन्नाथबुवा यांनी केले तर ते विमान धावपट्टीवरून योग्यरित्या जमिनीवर उतरेल अशी व्यवस्था करून विमानतळ बांधण्याचे काम सी आर व्यास यांनी केली. जगन्नाथबुवा यांनी शिष्याना प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसे प्रश्न विचारत शिकण्याचे प्रमाण कमी झाले. गाणे शिकताना ज्यावेळेस शिष्याची स्वतःची सुचण्याची प्रक्रिया बंद होते तेव्हा त्याचे शिक्षण पूर्ण झाले असे गुरू म्हणतात हे दुर्दैव आहे. खरे तर स्वतःचा विचार मांडण्यास गुरूने उद्युक्त केले पाहिजे."
सत्यशील देशपांडे यांनी जेव्हा कुमार गंधर्व यांच्याकडे गाणे शिकण्यास सुरूवात केली तेव्हा पु ल देशपांडे यांनी स्वतंत्रपणे विचार करत गाणे शिकण्याचा मंत्र दिला. ते म्हणाले, "गुरुची सेवा प्रश्न विचारून करायची असते, समर्पित होऊन त्यांच्या शरीराचे मालिश करून नव्हे." याचप्रमाणे सी आर व्यास यांनी स्वतंत्रपणे विचार केला, गुरुबरोबर सांगीतिक वादात्मक चर्चा केली आणि संगीत पुढे नेले, असे सत्यशील देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
चिंतामणी उर्फ सी आर व्यास यांनी निर्मिलेल्या संजोगीया, धनकोनी कल्याण, शिव अभोगी, दुगम हिंडोल, सगेरा (अहिरावती) अशा रागांबद्दल माहिती, रागाचे आलाप-ताना यासह यशवंत महाले यांनी पुस्तकासाठी लिहिली आहे. पं व्यास यांनी कलाकार कसा असावा यावर बंदिशीमधून “दुराभिमानाचा त्याग करावा आणि गुणांची सेवा करावी” असा विचार मांडला आहे तो महत्वाचा आहे. .
तजरे अभिमान जान गुनीजन सो
गुन की सेवा न मानो अब मान
कौन जाने अब मिट जाय सांस
तन की छिन नही भरोसा,
तन से गुन को देत जन मान
सुहास किर्लोस्कर
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख। योग्य व्यक्तीच्या हस्ते प्रकाशन
ReplyDeleteनितीन
खुप सुंदर लेख
ReplyDeleteप्रत्यक्ष उपस्थीत राहू शकलो नाही, पण वरील माहिती मुळे प्रत्यक्षात आले. जय...गुरू
ReplyDeleteखुप अभ्यासपूर्ण लेख.....
ReplyDelete