अब्बाजी

3 फेब्रुवारी - अब्बाजी - उस्ताद अल्लारखां याना आदरांजली

3 फेब्रुवारी हा प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा यांचा स्मृतीदिन.  त्याना अभिवादन करण्यासाठी त्यांचे सुपुत्र उस्ताद झाकिर हुसेन एक संगीत समारोह दरवर्षी षण्मुखानंद हॉल, मुंबई येथे आयोजित करतात.  या समारंभाची "वारी" करणे ही तबलावादकांसाठी पर्वणी असते.  पहाटे 6.30 वाजता पहिले सत्र सुरु होते.   यावर्षीच्या पहिल्या सत्रात उस्ताद अल्लारखा, गानसरस्वती किशोरी अमोणकर, सारंगीवादक ध्रुव घोष, सतारवादक उस्ताद रईस खाँ, विदुषी गिरिजा देवी याना आदरांजली वाहण्यात आली.


कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकामागोमाग एक कलाकार स्वरमंचावर कलाकृती सादर करत होते, कोणत्याही निवेदनाशिवाय.  त्यामुळे कार्यक्रमाचे वेगळेपण जाणवले. अनोख्या प्रार्थनेने सुरुवात झाल्यावर घोष या युवा कलाकाराने अहीर भैरव राग सादर केला.  आलाप-जोड असे वादन करून सकाळचा माहोल निर्माण केला.  तबल्यासाथ न घेता केलेले सादरीकरण आश्वासक होते.


किशोरी अमोणकर यांची नात तेजश्री अमोणकर,  शिष्या नंदिनी बेडेकर यानी किशोरीताईना वाहण्यासाठी राग अल्हैय्या बिलावल निवडला.  उस्ताद अल्लादिया खाँ यांची बंदिश "आली री" चे स्वर लावताना नंदिनी बेडेकर याना त्रास होत होता.  मध्यलय तीनतालात बंदिश कोणती सादर करायची हे ठरले नसावे कारण "कवन बटरिया" बंदिश सुरु होताच दूसरी बंदिश गाण्याबद्दल स्वरमंचावर दोघीनी चर्चा केली.  शिस्तबद्ध गानसरस्वती किशोरीताई अमोणकर याना आदरांजली वाहताना हे वेगळेपण जाणवले.  यानंतर श्री रघुनंदन पणशीकर यानी तोडी रागामधे किशोरीताई यानी गायलेल्या सुप्रसिद्ध रचना "मेरे मन" (विलंबीत तीनताल) आणि "बेगुन गुन गावे" (तीनताल) सादर केल्या.  श्री रघुनंदन यानी स्वरांची सुरेख मांडणी केली.  मिलिंद कुलकर्णी यानी हार्मोनियम वर फारच सुरेख साथ केली.  "म्हारो प्रणाम" नंतर "बोलावा विठ्ठल" हा अभंग सादर केला.   "म्हारो प्रणाम" गाताना द्रुतलय घेतली नसती तर अधिक योग्य झाले असते असे मला वाटले. तबला साथ भरत कामत !!  दिलेल्या वेळेत तिघानी गुरूला मानवंदना देण्याऐवजी कोणीही एका शिष्याने एकच राग गायला असता तर तीच किशोरीताईना आदरांजली ठरली असती कारण ख्याल गायनामधे सांगीतिक विचार दाखवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 

उस्ताद शाहिद परवेझ यांचे सुपुत्र शाकिर खान यानी उस्ताद रईस ख़ाँ याना  आदरांजली वाहताना सतार वादन करताना तोड़ी राग निवडला. आलाप-जोड-झाला असे वादन केले.  गायकी अंगाने सुरेल आलाप सादर झाला. अशी आलापी करण्याचा वारसा त्याना घराण्यातुन मिळाल्याचे जाणवले, हिच उस्ताद रईस खाँ याना खरी श्रद्धांजली ठरली.  विशेषतः दिलेल्या वेळेत बरेच प्रकार सादर करण्यापेक्षा एकच वादन दर्जेदार केले तर ते अधिक संस्मरणीय होते हे पुन्हा जाणवले.


ठुमरी गायिका विदुषी गिरिजा देवी याना आदरांजली वाहताना पंडित उल्हास कशाळकर यांचे सुपुत्र समीहन कशाळकर यानी देस रागात ठुमरी सादर केली.  "मोरा सैय्या बुलावे", "नदिया बैरी"  या रचना विलंबीत तीनतालात सादर केल्या.  गायन आश्वासक होते.  सारंगीं - पंडित ध्रुव घोष यांचे शिष्य - यूजी नाकागावा,  हार्मोनियम - मिलिंद कुलकर्णी आणि तबला - ईशान घोष यांच्यामुळे कार्यक्रम अधिक उठावदार झाला.  "तुम बिन नींद न आवे सावरिया" या ठुमरीला तबला साथ करताना श्री ईशान घोष यानी लग्गी ज्या नजाकतीने वाजवली त्यामधुन त्यांची तयारी दिसली.  ठुमरीचे भाव मिलिंद कुलकर्णी यांच्या हार्मोनियम वादनात दिसले. .

उस्ताद अल्लारखा इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यानी  "तालतपस्या" सादर करताना तबल्यातील रचना सादर केल्या. योगेश समसी आणि फजल कुरेशी यानी तबल्याच्या रचनाची पढन्त केली आणि त्या रचना शिष्यानी तबल्यावर सादर केल्या.

दुपारच्या दुसऱ्या सत्रांमधे तेजस टोपे या युवा कलाकाराच्या आश्वासक  "तबला सोलो"ने दुसऱ्या सत्रास सुरूवात झाली.  सुमेध चटर्जी यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेत असलेल्या सुमेध यानी  तीनतालात जय मिश्रा यांचा कायदा, कथक जयपुर घराण्याचा रेला सादर केला.

विद्वान पत्री सतीश कुमार यानी मृदंगम वादन सादर केले.   कर्नाटक शैलीचे वादन त्यानीं हार्मोनियम लेहरा साथीने केले हे विशेष.  मिलिंद कुलकर्णी यानी प्रत्येक लेहरा साथ वेगळ्या नजाकतीने केली.  16 आणि 8 मात्रामधे लयीचे वैविध्य समजून घेता आले.

स्टार ऑफ द डे



दुसऱ्या सत्रांमधे उस्ताद झाकिर हुसेन यानी अनौपचारिक शैलीमधे कार्यक्रमाचे निवेदन केले.  विंगेत बसून सर्व कलाकारांचे सादरीकरण लक्षपूर्वक ऐकणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांचे सर्व कलाकारांवर दडपण असणार. हे जाणून उस्ताद सर्व कलाकाराना धीर देत होते हे विशेष. निवेदनामधे सर्व युवा कलाकारांचा उल्लेख आदरपूर्वक करत होते.  मिलिंद कुलकर्णी  हार्मोनियम वादनाची साथ एकामागोमाग एका सादरीकरणामधें उल्लेखनीयरित्या करत होते.  उस्तादजी यानी मिलिंद कुलकर्णी यांचा उल्लेख "स्टार ऑफ द डे"  असा  केला.

रामदास पळसुले यानी तीनतालामधे तबलावादन सादर करताना कायदा आणि बंदिशी तिश्र जातीमधे करण्याची अवघड कामगिरी लिलया केली. अनाघात आणि बोलांची सुस्पष्टता हे वादनामधील वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

टी जी मुथुकुमारस्वामी यांच्या थाविल वादनाने या सत्राची सांगता झाली.   ‎दक्षिणेत मंदिरात वाजवले जाणारे हे वाद्य अनोखे आहे पण सलग एक तास हे वादन ऐकणे कठीण होते कारण या वाद्याला "बास" कमी असतो.  शिष्याला ताल धरण्यासाठी स्टेजवर पण मागच्या बाजूला खाली बसवले होते ते अनुचित वाटले.  उस्ताद झाकिर हुसेन अनौपचारिक निवेदनाद्वारे प्रत्येक वाद्याची माहिती श्रोत्याना मिळेल असे प्रश्न वादकाना विचारत होते.

संस्मरणीय भेट



3 फेब्रुवारी हा दिवस कायम स्मरणात राहील.  मी आणि पत्नी-निशा  पहाटे 6 वाजता "षण्मुखानंद" ला  पोहोचलो आणि उस्ताद झाकिर हुसेन याना भेटण्याचा योग आला.   अगणित तबलावादकांचा आदर्श/गुरु असलेल्या या महान व्यक्तिमत्वास नमस्कार केल्यावर क्षणभर काय बोलायचे ते समजेना.  बोबडी वळणे म्हणजे काय ते समजले. असे दिग्गज प्रथम  भेटल्यावर काय बोलायचे हा प्रश्नच आहे.  आपल्या दृष्टीने त्यांची महती सांगायची? आपली ओळख काय करून देणार?  तबला शिकतोय असे सांगायचे की आपले वादन समजून ऐकण्याचा प्रयत्न करतो असे सांगायचे?  धक्क्यातून सावरलो आणि म्हणालो "पिछले 25 सालो में पूना में आपके लगभग सभी कंसर्ट सुने है, एक भी नही मिस किया".  यावर ते हसत म्हणाले "क्यों, एक तो मिस करना था".  माझी मती कुंठीत झाली की  हात-पाय गार पडले, काही लक्षात नाही.  त्याना म्हणालो "लगता है मैं सपने में हुं..." यावर ते म्हणाले "ऐसी कोई बात नही"  पुढच्या वेळी भेटेन तेव्हा क़ाय बोलायचे त्याचाही रियाज केला पाहिजे.  काही प्रसंग संस्मरणीय असतात पण शब्दात व्यक्त करता येत नाहीत.  भावनाओ को समझो.


सुहास किर्लोस्कर

Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास