आये कुछ अब्र


फैज़ अहमद 'फैज़'  यांनी "आये कुछ अब्र" या गझल मध्ये मैफिलीचा माहोल कसा असावा याचे वर्णन केले आहे. त्या गझलचा अर्थ आधी समजून घेऊ आणि नंतर ही गझल अनेक गायकांनी कशी पेश केली आहे याचा लुत्फ घेऊ.  गझलच्या व्याकरणानुसार ही उत्तम गझल आहे.  गझलची दुसरी ओळ ".......आब आये" याने संपते. मद्यसेवनाने सुरू झालेली गझल पुढे प्रेयसीची आस व्यक्त करत वेगळ्या वळणावर जाते आणि जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवते.   प्रत्येक शेर मधली दुसरी ओळ पहिल्या ओळीच्या अर्थाशी विरोधाभास दर्शवणारी आहे.   फैज अहमद फैज यांचे हेच तर कौशल्य.


मदिरासेवन हे काही घटा घटा घाई गडबडीत उरकण्याचे कर्मकांड नव्हे.  त्याला एक माहोल असावा, शौकियाना अंदाज असावा आणि गप्पांच्या मैफलीत काही शेर-शायरी-गाना-बजाना शब्दांकडे लक्ष देऊन ऐकण्या-ऐकवण्याचा मौका शोधणारे रसिक "बसलेले" असावेत.....घरी कोणीतरी वाट पहात आहे याची शुद्ध नसावी, वेळेचे बंधन नसावे.  विमानाचे टेक ऑफ आणि हेलिकॉप्टरचे उडणे यातला फरक समजणारे यार असावे.



आये कुछ अब्र कुछ शराब आये
उसके बाद आये जो अज़ाब आये
[अब्र = cloud , अज़ाब=trouble, difficulty]


नभ मेघांनी आक्रमिलेले असावे आणि  सोबतीला मद्याचे प्याले असावे.  हे घन आनंदी आहेत, उल्हासी आहेत.  निराशेचे काळे ढग नाहीत.  शायर म्हणतो अशा आनंदी माहोलमध्ये शराबचा प्याला आहे.  आता यानंतर काहीही विपरीत/अघटीत घडणार असेल तर त्याची काही फिकीर करण्याची गरज नाही.  पहिल्या ओळीत आनंद तर दुसऱ्या ओळीत संकटाबद्दलचे भाष्य हा विरोधाभास.


"काफिया" या अरबी शब्दाचा अर्थ आहे- मागेमागे चालणारा, पुन्हापुन्हा येणारा, पायाला पाय लावून चालणारा.  पहिल्या शेर मध्ये काफिया (यमक) म्हणून आलेले "शराब, अज़ाब" हे शब्द एका वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेले स्वार आहेत. पण ह्या प्रत्येक स्वाराच्या मागे "रदीफ" म्हणून आलेला "आये" हा शब्द येतोच.  यानंतरच्या शेर मध्ये  "आफताब आये", "बेनकाब आये", "जवाब आये" हे यमक आणि अंत्ययमक जुळलेले आहे हे आपल्या लक्षात येईलच.



बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साकी  में आफताब आये
[बाम-ए-मीना = terrace/top of wine container, माहताब = moon, दस्त-ए-साकी = hands of  lady who serves wine, आफताब = sun ]

स्वर्गातल्या वरच्या मजल्यावरून चंद्राची मंद किरणे उतरत यावी.....आणि साकीच्या हातामधून सूर्याची किरणे दिसावी.  साकी म्हणजे मद्य कलशामधून देणारी सुंदरी.  कविकल्पना आहे त्यामुळे लगेच विचारू नका, कुठे असते साकी? तर रात्रभर वेळेचा हिशेब न ठेवता, घड्याळाकडे न पाहता चंद्रकिरणापासून सकाळच्या सुर्यकिरणाचा आस्वाद घेत मद्याचे पेले रिते झाले.



हर रग-ए-खूँ में फिर चरागाँ हो
सामने फिर वो बेनकाब आये
[ रग-ए-खूँ = blood in the veins, चरागाँ = lighting celebration ]

माझ्या नसानसात ते रक्त सळसळू दे, चैतन्यदायी अनुभव घेऊ दे, माझे आयुष्य पुन्हा प्रकाशमान होऊ दे....एकदा ती पुनश्च बुरखा न घालता माझ्यासमोर येऊ दे.  एकदा ती सर्व बंधने तोडून माझ्याकडे आली तर माझें आयुष्य उजळून जाईल, तोच दिवस माझ्यासाठी "अजी सोनियाचा दिनू" ठरेल......ती आल्यावर माझा दीपोत्सव साजरा होईल.



उम्र के हर वरक पे दिल को नज़र
तेरी महर-ओ-वफ़ा के बाब आये
[वरक = layer, महर-ओ-वफ़ा = benovelance & faith , बाब = company ]

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तू कशी माझ्यावर मेहेरबान आहेस, माझ्यावर तुझा कसा विश्वास आहे यांच्या आशादायी कथा ऐकायला याव्या, आयुष्याच्या प्रत्येक पानावर तू माझ्यावर फिदा आहेस यांच्या कथा लिहिलेल्या असू देत...



कर रहा था गम-ए-जहां का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये


आयुष्यात मी किती दुःखे भोगली, या दुनियेने किती दुःखे माझ्या वाट्याला दिली याचा ताळमेळ घालत होतो, दुःखांचा हिशेब लिहून ठेवताना तुझी प्रकर्षाने कितीतरी वेळा आठवण झाली....मोजदाद करता आली नाही.  (दुःखाशिवाय तू दिलेस तरी काय?). जरा गौर फर्माइये जनाब.  हिसाब आणि बेहिसाब या दोन शब्दातला विरोधाभास कसा सांगितलाय!!! वाह फैज, क्या बात है.



ना गई तेरे गम की सरदारी
दिल में रोज़ यूँ इंक़लाब आये
[सरदारी = leadership, इंक़लाब = revolution]

सर्व दुःखामध्ये सर्वात पुढे असलेले म्हणजेच प्रकर्षाने जाणवणारे, सल असणारे, टोचणारे दुःख कोणते? तर तुझे. तू माझ्यावर खफा आहेस, मला दुष्प्राप्य आहेस तरीही त्या दुःखाला कवटाळून मी बसलेलो आहे, रोज त्या दुःखाविरुद्ध दंड थोपटतो, आंदोलन करतो....तुला मिळवण्याची आस कायम ठेवण्यासाठी.  माझी मागणी मान्य कर.....तू फक्त हो म्हण! सरदारी आणि इन्कलाब हा विरोधाभास.



जल गए बज़्म-ए-गैर के दर-ओ-बाम
जब भी हम खानामां खराब आये
[बज़्म-ए-गैर = other's party, दर-ओ-बाम = doors and terrace,  ]

ज्या ज्या वेळेस मी उध्वस्त होऊन नशेत माझ्या घरी आलो त्या त्या वेळेस माझ्या शत्रूंची घरे, दरवाजे, खिडक्या जळून खाक झाल्या.  मी तुझ्यावर इतके प्रेम केले आहे, तुझ्या नकारानंतरही मला तुझीच आस आहे, मी उध्वस्त होऊनसुद्धा तुझी आशा सोडलेली नाही. माझी ही अवस्था पाहून माझ्या स्पर्धकांची घरे जळून खाक झाली.


इस तरह अपनी खामोशी गूंजी
गोया हर सिम्त से ज़वाब आये
[गोया = as if,  सिम्त = direction]

माझ्या शांततेच्या आवाजाचे पडसाद सर्वाना असे काही ऐकू गेले की चहूबाजूनी त्याचे प्रतिध्वनी ऐकू येत होते आणि उत्तरे मिळाल्याचा भास होत होता. शांतता आणि प्रतिध्वनीचा कल्लोळ हा आणखी एक विरोधाभास.


मक्ता म्हणजे शेवटचा शेर.  गझलच्या शेवटच्या शेर मध्ये तख्तल्लूस म्हणजे शायराचे नाव (टोपणनाव) लिहिण्याची प्रथा आहे. फैज यांनी या शब्दाचा वापर दोन अर्थानी केला आहे.  "तुका म्हणे", "नामा म्हणे" याप्रमाणे "फैज म्हणे" म्हणजे फैज म्हणतात. आणि फैज याचा दुसरा अर्थ मार्ग आशावादी आहे.


'फैज़' थी राह सर बा सर मंजिल
हम जहाँ भी पहुचे कामयाब आये
['फैज़' = poet's name/blessed]


तुझ्याकडे येण्याचा मार्ग आशावादी होता, तीच माझी मंझील होती. आम्ही जिथे पोहोचलो तिथे यश मिळालेच.   शायर फैज अहमद फैज यांनी शेवटच्या शेर मध्ये जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे.  यशाकडे जाणारा मार्ग असा वेगळा नसतो.  त्या मार्गावर चालत राहणे म्हणजेच यश मिळवणे.  यश आपोआप मिळत राहील, मार्गक्रमण करीत रहा.  कामयाबी तुम्हारे कदम चुम लेगी. आनंदी राहण्यासाठी प्रवास करू नका, प्रवास करताना आनंदी रहा, यशवंत व्हाल.  प्रेयसी/यश मिळणे हे उद्दिष्ट नसावे, त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यात आनंद मानणे हेच आयुष्य सुंदर बनवण्याचे इंगित आहे.


नेहेमीप्रमाणे मेहदी हसन यांनी ही गझल त्या शब्दांचा आब राखून त्या अर्थानुसार गायली आहे.  गुलाम कादीर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गझल मधल्या  शब्दातला अर्थ मेहदी हसन यांच्या गायनामधून आपल्यापर्यंत भिडतो. केहेरवा तालातील ही गझल मेहदी हसन यांनी स्वरमंडलच्या स्वरांच्या साथीने फार अप्रतिमरीत्या गायली आहे. प्रत्येक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याला समजावून सांगतात.  "कर रहा था गम-ए-जहां का हिसाब" ही ओळ त्यांनी किती अनोख्या अंदाजाने गायली आहे! "इस तरह अपनी खामोशी गूंजी" ही ओळ ऐकवताना त्या गुंज चे प्रतिध्वनी आपल्यापर्यंत पोहोचतात.  गझलमध्ये शब्दांना महत्व असते. ते शब्द गायकी अंगाने आपण मेहदी हसन यांच्याकडून ऐकतो तेव्हा शब्द आणि स्वर हातात हात घालून आपल्यासमोर येतात, तरीही स्वरांची।शब्दावर कधीही कुरघोडी होत नाही.



जगजीत सिंग यांनी ही गझल मेहदी हसन यांच्याच अंदाजाने गायली आहे.  तो अंदाज इतका सही सही आहे की यु ट्यूबवर काही रेकॉर्डिंगवर जगजीत सिंग यांचे नाव आहे पण आवाज मेहदी हसन यांचा आहे. या लिंकवर जगजीत सिंग यांचा लाईव्ह परफॉर्मन्स ऐकू शकतो.





गुलाम अली हीच गझल त्यांच्या स्टाईलने गातात. गुलाम अली गातात तेव्हा शब्दांपेक्षा गायकीला आणि त्यांच्या गायन कौशल्याला अधिक महत्व येते.   अर्थात प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा हा प्रश्न आहे.




नुसरत फतेह अली खां यांनी सुफीयाना अंदाजाने कव्वाली स्वरूपात ही गझल गायली आहे.  त्यांचा अंदाज ए बयां और आहे आणि श्रवणीय आहे.  हार्मोनियम वादनाने सुरू होणाऱ्या या गझलचा शेर ऐकण्यासारखा आहे. "मैं शराबी हुं पर आदमी का लहू नही पिता" यानंतरच्या ओळी फार सुंदर आहेत. सुफीयाना अंदाज ऐकल्यावर लक्षात येते की ही गझल ज्याप्रमाणे प्रेयसीसाठी लिहिली आहे तसेच खुदा प्रसन्न होण्यासाठी गायली आहे.




बेगम अख्तर यांनीसुद्धा ही गझल गायली आहे. खरे तर बेगम  अख्तर या गझल मधल्या आपणा सर्वांच्या आद्य गुरू.  जुन्या-नव्या गझलच्या या कार्यक्रमानंतर बेगम अख्तर पुन्हा ऐकायला सुरुवात केली.  फिल्म डिव्हिजनची ऑडियो यु ट्यूबवर उपलब्ध आहे. दूरदर्शनला त्यांची खूप उशिरा आठवण झाली असे दिसते.  त्यांचे व्हिडियो दुरदर्शनकडे असतील तर त्यांनी तो ठेवा आता आम जनतेसाठी खुला करावा.





सुहास किर्लोस्कर
9422514910





Comments

  1. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात अर्थ सांगितलात.. गझलकाराइतकाच तुमचा या गझल कडे पाहाण्याचा दृष्टिकोन आवडला....

    ReplyDelete
  2. हीच गझल रुना लैलाने सुद्धा ही गायली आहे ...ती पण ब्लॉग मध्ये add करता येऊ शकेल..शब्द प्रधान गायकी असली तरी सुश्राव्य आहे असं मला वाटतं
    https://youtu.be/9MDuKjQRHx8

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

घन गरजत बरसत बूंद बूंद