दिल ढूंढता है




गुलजार यांचा मौसम सिनेमा (1975) आवर्जुन बघण्यासारखा आहे.  संजीवकुमार, शर्मिला टागोर यांचा अप्रतीम अभिनय, कमलेश्वर यांची कथा साधीच आहे. पण ती खुलवली आहे पटकथा-संवाद यातून. गुलजार -भूषण बनमाळी यांची पटकथा आणि सिनेमाचे दिग्दर्शन, संवाद, प्रसंगानुरूप गाण्याचे शब्द गुलजार यांचे, संगीतकार आहेत मदनमोहन, सिनेमाचे पार्श्वसंगीत सलिल चौधरी यांचे.

गुलजार यानी सांगितले आहे की "दिल ढूंढता है, फिर वोही, फुरसत के रात दिन" या ओळी मिर्झा ग़ालिब यानी लिहिल्या आहेत. सिनेमामधें प्रसंग असाच होता त्यांमुळे गुलजार यानी या 2 ओळी पुढे नेऊन हे गाणें लिहिले.  सिनेमा बघताना हे गाणें, शब्द आणि संगीत किती समयोचित आहे याची प्रचिती येते.

मदनमोहन यानी या गाण्यासाठी बऱ्याच चाली बांधल्या. त्यातल्या 6 चाली आपल्याला ऐकता येतात...त्यांच्याच आवाजात. विशेष म्हणजे प्रत्येक चाल सुंदर आहे. 2 चाली सिनेमात घेतल्या.  एका चालीवर नंतर विरझारा या सिनेमातले गाणें तयार केले "तेरे लिये".    एक सुंदर चाल लावणे हेच मुळात कठीण काम आहे. गाण्याच्या शब्दाकडे इतक्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघून एकमेकांशी संबंध नसलेल्या इतक्या चाली कशा काय लावता येतात?  दोन्ही चाली तितक्याच तन्मयतेने ऐकल्या कि मदनमोहन का ग्रेट आहेत ते समजते.


वैद्यकीय अभ्यास करणारा विद्यार्थी आजारी पडल्यावर आयुर्वेदिक वैद्य यांच्या औषधाचा "कोर्स" सुरु असताना वैद्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नंतर तो शहरात जातो, गावात परत येऊ शकत नाही. शहरात गेल्यावर चंदाला विसरतो. गावात चंदाचे आयुष्य वाट बघण्यात जाते. बरेच वर्षानंतर नायक गावात येतो तेव्हा चंदाने आयुष्य वाट बघण्यात घालवले हे समजते. चंदाची अवस्था फार वाईट, त्याहुन वाईट अवस्था आहे तिच्या मुलीची.

नायक (संजीवकुमार) पूर्वीचे प्रेमाचे दिवस आठवत त्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी जाऊन जुन्या आठवणीना उजाळा देतो. ते गाणें म्हणजे दिल ढूंढता है...(संथ लयीमधले) - गायक भूपेंद्रने सुरेख आणि सुरेल  गायले आहे. गाण्याचा प्रसंग लक्षात घेतला तर अशा वेळी कोणी रागदारी गाणार नाही. त्यावेळी शब्द आणि त्याचा अर्थ महत्वाचे. भूपेंद्रला हे चांगलेच उमजले आहे.

निसर्गाचा आणि आठवणींचा मागोवा घेत नायक त्या गावी परत येतो, खुप वर्षानंतर. ते "फुरसत के रात दिन" शोधत. त्याला तरुणपणीचे नायिकेबरोबरचे प्रसंग आठवतात (शर्मिला टागोर).  इतक्या वर्षानी त्याच ठिकाणी आल्यावर त्याला जे आठवते ते आपल्याला दिसते - म्हणजे पांढरे केस असलेला संजीवकुमार झाडामागुन बघतो तर तिकडून तरुण संजीवकुमार-शर्मिला फिरत फिरत येत आहेत, गप्पा मारत आहेत. आठवणीचे चित्रीकरण कसे असावे याचा वस्तूपाठ. गुलजार यांच्या दिग्दर्शन कौशल्याला सलाम.

छड़ी रे छड़ी गाण्यातली ती छड़ी, त्याला जोडलेल्या आठवणी.  तीच छड़ी पुन्हा तशीच नाचवत संजीवकुमार फिरतो. संतूर, बासरी, व्हायोलीन याचा फार सुंदर मेळ साधला आहे . आठवणीच्या मागोव्याची सफर संपवून शेवटी भूपेंद्र गुणगुणतों...."दिल ढूंढता है, फिर वोही"







द्रुत गती मधली दूसरी चाल सुद्धा तितकीच सुंदर. भूपेंद्र आणि लता मंगेशकर यानी गायले आहे. डोंगर दऱ्यामधल्या साद घालणाऱ्या लता मंगेशकर यांच्या आलापीने गाणें सुरू होते. कॅमेरा पर्वतरांगामधून पुन्हा त्या आठवणीत असलेल्या ठिकाणी येतो. तिथे नायकाला पूर्वीचे दिवस, क्षण, त्या भेटी आठवतात.  तबल्याच्या ठेक्यामुळे गाण्याचा मूड बदलला आहे.  एकाच फ्रेममधे आपल्याला नायकाची 2 रुपे दिसतात.  म्हाताऱ्या नायकाला तरुणपणाचे दिवस (लम्हे) आठवतात.  संतूर, गिटार, फ्लूट आणि केरवा तालात तबला.




आठवणी अशाच असतात...ते प्रसंग आठवून कधी आनंद होतो (द्रुत गती मधले गाणे), कधी दुःख होते (संथ लयीतले गाणे)

संजीवकुमार ने नेहेमीप्रमाणे याही सिनेमात नायकाच्या भावना काय आहेत याचा अभिनय त्याच्या देहबोलीमधून, आवाज, डोळे यातून दाखवला आहे. शिवाय आपण फार अभिनय करत आहोत याचा देखावा नाही.  शर्मिला टागोर यानी डबल रोल असा काही अभिनीत केला आहे की वा क्या बात है. वाट बघून थकलेली तरीही आशा न सोडणारी युवती, आईची वेदना समजून असलेली वेश्या, नायकाला छड़ी परत न देता सतावणारी ती नायिका अशी विविध रुपे शर्मिलाने लिलया केली आहेत.

दिल ढूंढता , है फिर वही फुर्सत के रात दिन
बैठे रहें तसव्वुर -ऐ -जाना किये हुए

माझे मन शोधत आहे पूर्वीचे ते निवांत दिवस आणि रात्री.  शांतपणे बसून प्रेयसीचा विचार करण्यात वेळ घालवत आहे.

जाड़ों की नर्म धुप और आँगन में लेट कर
आँखों पे खींच कर तेरे दामन के साए को
औंधे पड़े रहें कभी करवट लिए हुए

हिवाळ्यातल्या त्या कोवळ्या उन्हात अंगणात निवांतपणे पडण्याचा / झोपण्याचा प्रयत्न करत आहे.  तुझ्या पदराची सावली डोळ्यावर ओढून घेत कधी उताणे तर कधी एका कुशीवर पडायचो. ते दिवस मला आठवतायत

या गर्मियों की रात जो पुरवाइयाँ चले
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए

तसेच उन्हाळ्यातल्या थंड वारे वाहणाऱ्या त्या रात्री, पांढरया शुभ्र चादरीवर पडून तारे बघत छतावर पडून रहायचो आणि उशिरा पर्यंत जागायचो.  त्या रात्री मला आठवतायत.

बर्फीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूंजती हुयी , खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे भीगे से लम्हे लिए हुए

बर्फाळ थंडीमध्ये कोणत्याही डोंगर-दरया मधल्या शांततेचा आवाज ऐकत डोळ्यामधे ते भिजेलेले क्षण साठवत होतो, शांतते मधें स्वतःशी बोलताना डोळे पाणावले.. ते क्षण, ते दिवस आठवतायत मला.

वादी में गूंजती हुई, खामोशियाँ सुनें

शांततेचा आवाज ऐकण्याची आपल्याला सवय कधी होणार?  कधीही समुद्रकिनारी जा, डोंगर-दरयात जा, लोक तिथेही ढिंगच्याक म्यूज़िक लावून शांतता घालवताना दिसतात.  रॉक क्लब मधें कुणी शांतता ठेवायला सांगत नाही, तिथे गोंगाट enjoy करू शकता.  शांतता जिथे आहे, तिथे त्याचा आनंद घ्या.   स्वतःशीच गप्पा मारायला वेळ नाहीये आपल्याकडे. शांततेचा आवाज ऐकत स्वतःशी बोलले पाहिजे एकदा !!

सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास