नैना ठग लेंगे



डोळ्यांची भाषा वेगवेगळ्या गाण्यात सांगितली आहे, "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनाचे", "ये आँखे उफ युम्मा", "तेरी आँखों के सिवा दुनिया मे रख्खा क्या है", इन आँखों की मस्ती के", "दो नैना इक कहानी" अशी बरीच.   ओंकारा चित्रपट शेक्सपियरच्या ओथेल्लो म्हणजे संशयकल्लोळाचे एक भारतीय व्हर्जन आहे. डोळ्यांनी फसवले असे दोन प्रेमीकांपैकी एकाचे ठाम मत आहे. गुलज़ार यानी त्यामुळेच तर लिहिलय "नैना ठग लेंगे".   ते बरोबर की चूक हे सिनेमा बघितल्यावर समजते.   राहत फतेह अली खान यानी अतिशय सुरेल गायलेले है गीत संगीतबद्ध केले आहे विशाल भारद्वाज यानी. टिपेचा आवाज लावलाय तरीही गाण्यातला भाव उमजतो.  फार मोजकीच वादये वाजतात.


नैनों की मत माणियो रे
नैनों की मत सुणियो
नैना ठग लेंगे
जगते जादू फूकेंगे रे जगते जगते जादू
नींदे बंजर कर देंगे रे

या डोळ्यांवर काही विश्वास ठेवू नका, ते फसवे आहेत, ते जेव्हा उघड़े असतात तेव्हा तूम्हाला भुरळ पाडतात, तुमची झोप उडवतात.
अंतऱ्याला सतार फार छान वाजवली आहे. 

भला मंदा देखे पराया सगा रे
नैनों को तो डसने का चस्का लगा रे
नैनों का ज़हर नशीला रे

आपले आणि परके असा भेदभाव करत नाहीत हे डोळे, त्याना दंश करायला आवड़ते, त्याची चटक लागते, डोळे फार विषारी असतात.   डोळे तूम्हाला फसवे इंद्रधनुष्य दाखवतात.  (भावार्थ सांगताना भाषेचा लहेजा जातो, त्यामुळे आपणच शब्दार्थावरुन अर्थ समजून घ्यावा, त्यात जास्त मजा आहे)

बादलों में सतरंगियाँ बोंवे भोर तलक बरसावे
बादलों में सतरंगियाँ बोंवे नैना बांवरा कर देंगे
नैना ठग लेंगे...


नैना रात को चलते-चलते स्वर्गां में ले जावे
मेघ मल्हार के सपने बीजें हरियाली दिखलावे
नैनों की ज़ुबान पे भरोसा नहीं आता
लिखत पढ़त रसीद खाता
सारी बात हवाई
बिन बादल बरसाए सावन सावन बिन बरसातां
बिन बादल बरसाए सावन नैना बांवरा कर देंगे
नैना ठग लेंगे...

या डोळ्यांची दोन पाखरे बोलता बोलता तूम्हाला स्वर्ग दाखवतील,  (भर उन्हात) पावसाची स्वप्ने दाखवून तूम्हाला चिंब करतील. डोळ्यांच्या बोलण्यावर आता विश्वास नाही राहिला, सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत, हे डोळे बिन बादल बरसात करतील, या डोळ्यांवर विश्वास ठेवू नका.




विशाल भारद्वाज यानी शेक्सपियरची नाटके भारतीय वातावरणात सादर केली ते सिनेमे आवर्जुन बघण्यासारखे आहेत.  हैमलेट (हैदर), मैकबेथ (मक़बूल), ओथेल्लो (ओंकारा).   ओंकारा सिनेमा बघितला तेव्हाच आवडला होता पण गाण्याकडे तितके लक्ष गेले नव्हते. माझी कन्या सानियाने हे गाणें ऐकायला सांगितले, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकले आणि गाण्याच्या प्रेमात पडलो.  पुढची पिढी काय ऐकते ते ही ऐकले पाहिजे, बरेच काही चांगले हाती लागते.  "आमच्या काळी...." ही टेप लावत बसले की देवाण घेवाण थांबते आणि प्रत्येक जण आपापल्या कोषात आपलेच भारी म्हणत डोळे आणि कान बंद करतो.  जग पूर्वीही सूंदर होते, आत्ताही आहे.

गुलज़ार black and white चित्रपटापासून गाणी लिहित आहेत, तेव्हा जसे ते बिमल रॉय-हृषिकेश मुखर्जी यांच्याबरोबर काम करायचे तितक्याच उत्साहाने आणि उमेदीने आत्ताच्या विशाल भारद्वाज यांच्याबरोबरही काम करतात याचे मला नेहमीच कौतुक वाटते.  असे नव्या पिढी बरोबर relevant रहाणे वाटते तितके सोपे नाही.  मजरूह सुलतानपुरी यानी ही किमया साधली होती.  जब दिल ही टूट गया (के एल सैगल-नौशाद) पासून पहेला नशा  (उदित नारायण-साधना सरगम-जतिन ललित-अमीर खान)  अशी गाणी त्यानी लिहिली, त्या त्या पिढीला आवडली.   दि माडगुळकर यांच्याबद्दल एक किस्सा वाचनात आला, गदिमा प्रवास करत असताना प्रवासी बोलत होते की पूर्वीची गाणी काय असायची "देहाची तिजोरी, भक्तिचाच ठेवा", नाहीतर हल्लीची गाणी "तुझ्या उसाला लागल कोल्हा". खरे तर दोन्ही गाणी गदिमा यानीच लिहिली आहेत. तर असे हे "हल्ली" च्या गाण्याना नावे ठेवणे फार "पूर्वी" पासून चालत आले आहे.  आपण असे लिहू शकलो नाही तरी या महान गीतकारांच्याप्रमाणे निदान ऐकण्यात versatile  म्हणजेच सर्वश्रुत रहाण्याचा प्रयत्न करू शकतो. 


ओथेल्लो म्हणजेच ओंकारा मधला "तो" पत्नीवर संशय घेतो तेव्हा जाणवत रहाते की कोणत्याही संस्कृती मधें चारित्र्याचा पुरावा स्त्रीलाच द्यावा लागला आहे, अग्निपरीक्षा तिलाच द्यावी लागली, पुरूष नामानिराळा राहिला आहे. 

नैना ठग लेंगे लिहिणारे गुलजार आणि बिड़ी जलायले लिहोणारेही गुलज़ार.  खरे तर पोक्तपणाचा चष्मा काढून ऐकले तर बिड़ी जलायले सुद्धा उत्तम लिहिलय. गाण्याचा सिनेमातला सन्दर्भ लक्षात घेतला आणि जी नर्तिका गाणें म्हणते आहे त्या वातावरणाचा विचार केला तर त्यांच्याच गावरान भाषेत सुरेख लिहिलेले काव्य म्हणजे बिड़ी जलायले. 

गुलज़ार यानीच लिहिलेली एक नज्म, डोळ्यांची भाषा वेगळ्या नजरेने, वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते.


तेरी आँखों से ही खुलते है सवेरों के उफ़क़
तेरी आँखों से ही बंद होती है ये सीप की रात
तेरी आंखें है या सजदे में गमगीन नमाज़ी

तुझ्या डोळ्यातूनच सकाळचे क्षितिज खुले होते, तुझ्या डोळ्यानीच बंद होते ही रात्र, शिंपल्यासारखी. तुझे डोळे आहेत की नमाज पढणारा / साधक  दुःखाने प्रार्थना करण्यासाठी भक्तिभावाने झुकला आहे? 
(उफ़क़ - क्षितिज, गमगीन - दुःखी,  सिप - शिंपला)

पलके खुलती है तो यूं गूंज के उठती है नजर
जैसे मंदिर से जरस की चले नमनाक सदा
और झुकती है तो बस जैसे अज़ान खत्म हुई है

तुझ्या पापण्या उघडतात तेव्हा नजरेचा प्रतिध्वनी ऐकू येतो,  जसे मंदिरातील घंटेचा आवाज बराच वेळ आपल्याला ऐकू येत रहातो. डोळे बंद होतात तेव्हा वाटते ती अजान- ती भक्ताना बोलावण्यासाठी दिलेली हाक बंद झाली, संपली.
(जरस - मंदिरातील घंटा)

तेरी आंखें तेरी ठहरी हुई गमगीन सी आंखें
तेरी आँखों से ही तख़लीक़ हुई है सच्ची
तेरी आँखों से ही तख़लीक़ हुई है ये हयात

तुझे डोळे दुःखात विश्रांती घेत आहेत असे वाटते, तुझ्या डोळ्यामुळेच माझी (हे काव्य लिहिण्यातली) सृजनशीलता (creativity) खरी झाली, तुझ्या डोळ्यामुळेच माझ्या जगण्याला काही अर्थ आहे...

ही नज्म गुलज़ार यांच्या आवाजात ऐकली तर अर्थ भिडतो...





सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास