रोज रोज आंखों तले...एक दिन सपना चले



रोज रोज आंखों तले...एक दिन सपना चले


दररोज डोळ्यामधे एकच स्वप्न सुरु असते, पण हा झाला शब्दार्थ. गाण्यातल्या शब्दाला गहिरा अर्थ आहे, त्याचा अर्थ सांगता येईल पण भावार्थ प्रत्येकाने विचार करून समजून घ्यावा असे हे गुलजार यांचे काव्य. 

कवितेचा अर्थ समजून घेऊन प्रसंगाचा विचार करून राहुल देव बर्मन
यानी दिलेले मधूर संगीत गाण्याला चार चांद लावणारे आहे. बराच वेळ आपण हे गाणें गुणगुणत रहातो. आशा भोसले यांच्याबरोबर तितक्याच उत्कटतेने गायले आहे अमितकुमार यानी. 

रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना चले
रात भर काजल जले, 
आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले

दररोज डोळ्यामधे एकच स्वप्न सुरु असते. रात्रभर डोळ्यात जणू स्वप्नाचा दिवा जळत रहातो, काजळी या अर्थाने रात्रभर झोप नाही, डोळ्यात स्वप्न आहे, ती दुःखी आहे, त्यामुळे काजळ या अर्थाने सुद्धा गुलजार यांच्या शब्दांचा मागोवा घेता येईल. डोळ्यात जसे स्वप्नांचा दिवा तेवत रहातो त्याची काजळी साठत रहाते, तसे हे स्वप्न कधी संपत नाही. पणतीची वात रात्रभर जळत रहाते तसे डोळ्याच्या पणतीमधें काजळ जळत रहाते. डोळ्याला स्वप्नांचा दिवा/पणती ही कल्पना गुलजार यानी सुरेखरित्या वापरली आहे. 

जबसे तुम्हारी नाम की मिसरी होंठ लगायी है
मीठा सा ग़म है, और मीठी सी तन्हाई है

तुझे नाव जेव्हापासुन माझ्या ओठावर आले, तेव्हापासून हे दुःख मधुर आहे हे समजायला लागले. या विरहाच्या दुःखाची चटक लागली, तू नसल्यामुळे एकटेपणाचे दुःखसुद्धा हवेहवेसे वाटते, हे आयुष्य जगण्यासाठी मला काहीतरी कारण मिळाले. 

छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम
जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम

माझ्या हृदयात एक धड़धड़ आहे, एक प्रश्न सारखा पडतो, तो प्रश्न तू सोडव, मेल्यावर जगणे समजले, तू आयुष्यात आल्यावर माझे अस्तित्व संपले, मी जगतोय ते केवळ तुझ्यासाठी, आता तु आयुष्य ओवाळून टाकायला शिकव...


आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है
बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है

रोज़ रोज़ आँखों तले...







डोळ्यावर तुझे केस रुळतात तेव्हापासून माझ्या डोळ्यावरची झोप
उडाली आहे त्यामुळे माझ्या स्वप्नांची झोप उडाली आहे. तुझ्या "बटा"मुळे मला हल्ली झोप लागत नाहीत, त्यामुळे स्वप्ने पड़त नाहीत, तुझी स्वप्ने बघू शकत नाही हिच तर माझी तक्रार आहे. 

आशा भोसले यानी हे गीत इतक्या उत्कटतेने गायले आहे की गाण्यातला
दर्द समजतो. मुखड्यानंतर वाजणारी बासरी कसा परिणाम साधते ते ऐकावेच. मादल या वाद्याचा "तीं" वाजतो तो श्रवणीय. गुलजार-पंचम-आशा या त्रयीने आपले आयुष्य समृद्ध केलेली बरीच गाणी आहेत. त्यांच्याबरोबर या गाण्यात आहे अमितकुमार. 

अमितकुमारने या गुणी गायकाने वेगवेगळ्या ढंगाची गाणी लिलया
गायली आहेत पण किशोरकुमार बरोबर आपण तुलना करत त्याच्यावर अन्याय केला. राहुल देव बर्मन यानी अमितकुमारचा आवाज फार छान वापरला. किशोरकुमार्चे वलय आणि स्टाइल भेदुन अमितकुमार बाहेर येऊ शकला नाही आणि नंतर कुमार सानू, बाबुल सुप्रियो वगैरे ऐकणे आपल्या नशिबी आले. 


राज सिप्पी यानी दिग्दर्शन केलेला 1986 चा जीवा सिनेमा, संजय दत्त आणि मंदाकिनी यांच्याबद्दल काहीही लिहिण्यासारखे नाही, उगाच मिठात खडा कशाला ? 
वैधानिक इशारा - हे गाणे बघणे आरोग्यास हानिकारक आहे. 


सुहास किर्लोस्कर











Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास