मराठी आशा




आशा भोसले यांची गाणी ऐकली की अष्टपैलुत्व म्हणजे काय याचा अर्थ समजतो. वेगेवगळ्या भावना स्वरातून आशा अशा काही व्यक्त करते कि त्या गाण्यातले भाव आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचतात, मनाला भिडतात, आपण त्या माहोलमधें जातो.



आशा भोसले यांची मराठी गाणी बरीच आहेत आणि त्यात विविधताही तेवढीच आहे. एकाच गाण्यात दोन वेगळ्या भावना व्यक्त करणारी हिंदी गाणी याबददल यापूर्वी एक लेख लिहिला होता, तशीच गाणी मराठीत सुद्धा आहेत.  नको रे नंदलाला हे अनिल अरुण यानी संगीतबद्ध केलेले गाणें असेच भन्नाट आहे. नाव मोठं लक्षण खोट या चित्रपटातील या गाण्याचे शब्द आहेत शांता शेळके यांचे.  सुरूवातीचा आलाप, धरू नको हरी रे पदराला ही ओळ कशी गायली आहे, सतार, तार शेहनाई, तबला, "भलत्या ठाई" या ओळीला वाजणारा काँगो-बोंगो चा पाश्चिमात्य ठेका, नंतर पुन्हा "नको रे..." पासून सुरु होणारा तबला सारेच अचंबित करणारे.  हे  आशा भोसले आणि आशा भोसले या दोन वेगवेगळ्या गायिकानी गायले असेच वाटते.





या सुखानो या हे सदाबहार गाणे दरवेळी पुनःप्रत्ययाचा वेगळा आनंद देते आणि आपण दिवसभर ते गाणे गुणगुणत राहतो. "पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती", " हात नका लावू माझ्या साडीला, रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी, एक झोंका, सुहास्य तुझे मनास मोही/मी मज हरपुन बसले ग, नाच रे मोरा, मना तुझे मनोगत कळेल का, अशी विविध ढंगाची गाणी गाणाऱ्या आशा भोसले यांच्या गाण्यातल्या अभिनय कौशल्याबद्दल लिहावे तितके थोडेच.



मराठी सिने संगीतामधे आशा भोसले यानी वेगवेगळ्या गायकांबरोबर सह गायन केले आहे.  त्यातील काही वेगळी गाणी सदाबहार आहेत.  सुधीर फडके यांच्याबरोबर आशा भोसले यांची बरीच युगुल गीते आहेत.  यमन रागावर आधारीत "धुंदी कळ्याना...धुंदी फुलाना" फार सुरेख गाणे आहे.  जगदीश खेबुडकर यांच्या काव्याला संगीतकार सुधीर फडके  यानी स्वरबद्ध करताना शेवटच्या कडव्याला वेगळी चाल दिली आहे. " चिरंजीव होई.." हे कडवे अनोखे आहे.  सुधीर फडके यानी तांत्रिक दृष्टया सुरेल गायले आहे पण प्रेमगीताच्या भावना म्हणजेच रोमैंटिक भाव त्यातून व्यक्त होत नाहीत असे मला वाटते. किशोरकुमार-मोहमद रफी यांची हिंदी गाणी ऐकल्यावर तर ते जास्तच जाणवते. तसेही मराठी सिनेसंगीतामधे नायकाच्या आवाजाप्रमाणे गायक निवडले गेले नाहीत, गायकानी गाण्यात अभिनय तसा कमीच दाखवला.  या गाण्यात तर हे विशेष जाणवते.





  मराठा तितुका मेळवावा या चित्रपटासाठी आनंदघन यानी स्वरबद्ध केलेले आणि हृदयनाथ मंगेशकर यानी आशा भोसले यांच्याबरोबर गायलेले "नाव सांग सांग सांग, गाव सांग" हे असेच नितांत सुंदर गाणें. शांता शेळके यांचे शब्द आणि आशा भोसले याचा गाण्यातला आणि बोलण्यातला ठसका श्रवणीय. पं हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी, पं शिवकुमार शर्मा यांचे संतुर आणि ढोलकी याचा सुरेल संगम म्हणजे हे गाणें. अंतऱ्याला केहेरवा तालातील लय बदलते म्हणजे निम्म्या लयीने कमी होते. मन्ना डे यांच्यासह नंदादीप चित्रपटासाठी गायलेले "चांद गगनी आला, सख्या रे, सोड मला जाऊ दे..." हे हिराकान्त कालगुटकर यानी लिहिलेले आणि अविनाश व्यास यानी स्वरबद्ध केलेले फार ऐकले गेले नसेल कदाचित पण सुरेख आहे. "तुझ्यातले अन चंद्रा मधले साम्य मला पाहू दे..." ही अशी मराठी प्रेमगीतामधली भाषा जरा जास्तच अलंकारिक आहे असे मला वाटते.




रस बरसत अमृत वीणा हे गाणें आशा भोसले यानी पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर फार सुरेख गायले आहे.  पतिव्रता सिनेमातील मधुसूदन कालेलकर यांच्या काव्याचे संगीतकार आहेत राम कदम. जोग रागावर आधारित असलेले हे गाणें अंतऱ्याला झिंझोटी रागाच्या जवळपास जाते तेव्हा तालही बदलतो, दादरा होतो.





ग़ुळाचा गणपती या चित्रपटाचे दिग्दर्शक-नायक-संवाद लेखक-संगीतकार होते पु ल देशपांडे !!! गीतकार ग दि माडगुळकर, गायक -  माणिक वर्मा. भीमसेन जोशी ( इंद्रायणी काठी) वसंतराव देशपांडे आणि  आशा भोसले.

"ही कुणी छेडिली तार" हा वसंतराव आणि आशा  यांचा असाच वेगळा अविष्कार केदार रागावर आधारीत आहे.




केदार रागावरच आधारीत "तुझी न माझी जाहली प्रीत" हे आणखी एक गाणे या दोघानी गायले आहे. वैजयंता चित्रपटाचे संगीतकार वसंत पवार यानी हे शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणें  दोन दिग्गजांच्या गायनामुळे संस्मरणीय झाले.




अर्थात ही यादी बरीच मोठी आहे. रविन्द्र साठे-अंजली मराठे यांच्यासह गायलेले "हे जीवन सुंदर आहे" हे गाणें एकाच विश्वाकडे दोघांचा वेगवेगळा दृष्टिकोन दाखवते.  सुधीर मोघे यांचे शब्द हेच सांगतात की जग कसे आहे हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.. वेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्माण करणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्या चौकट राजा या चित्रपटाचे संगीतकार आनंद मोडक यानी आशा भोसले यांची अनेक अवीट गाणी दिली आहेत.



गायिका आशा भोसले यांच्याकडे मी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणुन बघतो.  विपरीत परिस्थितीमधे न खचता स्वतःची ओळख बनवणे आणि इतके वर्षे काल सुसंगत राहणे हे केवळ "आशा" च करू शकते.



हे जीवन सुंदर आहे
नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी

इथं इमारतीच्या जंगलांचा वनवास
त्यातून दिसणारं टीचभर आकाश
आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास


कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे



पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची


इथ गाणं लोकलचं पाणी तुंबलेल्या नळाचं
आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं

इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे

हे जीवन सुंदर आहे




सुहास किर्लोस्कर










Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास