धागे तोड़ लाऊं




एखाद्या गाण्यात तूम्हाला डोलायला लावायचे असेल तर संगीतकार एका वाद्याने सुरुवात करतोत्या गाण्याचा ठेका आपल्या लक्षात रहातो, त्या गाण्याची लय आपल्यात भिनते आणि हळूहळू एकेक वाद्य वाढवत नेतातसंगीतकार याप्रकारे आपल्याला त्यांच्याबरोबर घेऊन जातो, आपण अजाणतेपणे संगीतात रममाण होऊन जातो, डोलायला लागतो.......

हे गाणें सुरु होते घटम या कर्नाटक संगीतातील वादयाने.  विक्कू विनायकम यानी या वाद्याला लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा उचलला. घटम म्हणजे मटका म्हणजेच पाण्याचा माठ चांगला वाजतो. त्याच्या तोंडावर हात, मुठीने आघात करून वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनी निर्मिती होते. तबल्यावर डग्याचा परिणाम बाससाठी होतो तसाच परिणाम घटमच्या तोंडावर वाजवून होतो.  बोटानी इतरत्र वाजवले जाते.

गाणें सुरु होते तेव्हा घटम वाजतो, संतुर वाजते आणि आपण हळूहळू ताल धरतो.  राहत फ़तेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यानी अप्रतीम गायलेले गाणें संगीतबद्ध केले आहे शंकर-एहसान-लॉय यानी.  कोण म्हणते नविंन गाणी श्रवणीय नसतात? हे गाणें जितक्या वेळा ऐकू तितके आपण त्या गाण्याच्या प्रेमात पडतो.  राहत यांच्या आवाजाची फिरत - खालच्या स्वरांत आणि एकदम वर, त्यांची सरगम ....सगळेच सुरेल.

"धागे तोड़ लाऊं" हा मुखडा नाही. मुखडा आहे - बोल हलके हलके.   गुलज़ार यांचे अप्रतीम शब्द, अर्थ लागल्यावर वेगळ्या विश्वात नेणारे...


धागे तोड़ लाओ चाँदनी से नूर के
घूंघट ही बना लो रोशनी से नूर के
शर्म गयी तो आगोश में लो
साँसों से उलझी रहे मेरी सांसें
बोल ना हलके-हलके, बोल ना हलके-हलके,
होंठ से हलके-हलके, बोल ना हलके

चांदणीच्या सौंदर्याचे धागे तोडून आणु, त्याच्या मंद प्रकाशाचा घूंघट करू, लाजुन चूर झाले तर मला मिठीत घे, आपले श्वास एकमेकांशी उलझतील, कोमल आवाजात मला ते शब्द तुझ्या ओठातुन ऐकू देत.


बोल हलके हलके नंतर हळूच वाजणारी बासरी, गिटार, बेस गिटार,  संतुर आणि बासरीचा गोडवा आपला पीछा सोडत नाही.  संतुर, घटमचा ठेका सुरु आहेच..गाणें एकदा बासरीसाठी, एकदा फक्त गिटार साठी, एकदा सारंगीसाठी, गुलजार यांचे शब्द ऐकण्यासाठी ऐकले की त्याची खासियत कळते.


नींद का सौदा करें, इक ख्वाब दें, इक ख्वाब लें
इक ख्वाब तो आँखों में है, इक चाँद के तकिये तलें
कितने दिनों से ये आसमान भी
सोया नहीं है,  इसको सुला दें
बोल ना हलके हलके...
सर्व संगीत थांबते आणि हलकेच बासरी वाजते.

चल, एक करार करू, स्वप्नांची देवाण घेवाण करण्याचा. तुझं स्वप्न मला दे, माझे स्वप्न तुला देतो.  एक स्वप्न डोळ्यात आहे, दूसरे लांब चंद्राच्या उशी मागे.....बरेच दिवस झाले हे आकाश झोपले नाही, ते शांतपणे झोपले की माझ्या कानात ते शब्द हळूवारपणे सांग.

राहत आणि महालक्ष्मी यानी गायलेली सरगम, बासरी आणि सारंगी ऐकताना एकत्रीत परिणाम होतो तो श्रवणीय आहे.  हे गाणें भीमपलास रागावर आधारित आहे.


उम्रे लगी कहते हुए, दो लफ़्ज़ थे इक बात थी
वो इक दिन सौ साल का, सौ साल की वो रात थी
कैसा लगे जो चुप-चाप दोनों, पल-पल में पूरी सदियाँ बिता दें

आयुष्य गेले ते दोन शब्द बोलायला...दोनच शब्द होते, त्यात पूर्ण सार सामावलेले होते....सांगायचे ठरवल्यावर एक दिवस शंभर वर्षासारखा वाटला आणि रात्रही.  दोघेही गप्प होतो....आणि एक एक क्षण शतकानु शतके गेल्यासारखा वाटला.  एक शब्द बोलायचा होता, तो बोलायला पूर्ण आयुष्य घालवावं लागलं.

सारंगीवर बोल ना हलके हलके...
शांतता
बासरी
धागे तोड़ लाउ..
संतुर
घूंघट ही बना लू
सारंगी
बोल हल्के हल्के
पॉझनंतर सारंगीचा परिणाम ऐकण्यासारखा आहे




गाणें आणि झूम बराबर झूम सिनेमा बघू नये, गाणें ऐकावे.  अगदी भारतभूषण, राजेन्द्रकुमार, प्रदीपकुमारच्या सिनेमा सारखे.........गुलझार, शंकर-एहसान-लॉय यांची ऊंची  दिग्दर्शक शाद अली गाठू शकला नाही  त्याला आपण क़ाय करणार. आपण गाण्याचा आनंद बघता घेऊ.

गुलजार यानी इथे कोठेही त्या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. तो शब्द बोलायला एवढा वेळ गेला, ते  कवितेतुन सांगितले.  ते एकमेकांचे एकमेकांवर आहे, असते, कुणाला सांगायला आवडतें, कुणाला ऐकायला आवड़ते, कुणाला सांगता समजते, कुणाला समजून सुद्धा ऐकायची इच्छा असते. आता एवढे सगळे सांगून झाले तरी मुख्य सांगायचे राहिलेच, पण सांगता समजलेच ना?


सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास