एका लग्नाची गोष्ट



  
मी आणि निशा दोघांना एकत्र गाठून आमची कन्या सानियाने  आयुष्याचा जोड़ीदार  निवडला असल्याचे सांगितले, तेव्हा फार आश्चर्य वाटले नाही कारण लहानपणापासून तिला काय वाटते ते स्पष्टपणे सांगणे, प्रश्न विचारणे असे वातावरण घरात पहिल्यापासून होते. सानिया ने Biodiversity मधें मास्टर्स केल्यानंतर एक वर्ष ग्रामीण भागातील शाळेत काम केले, 2 वर्षे Teach For India मधें आर्थिकदृष्टया अप्रगत कुटुंबातून आलेल्या मुलांसाठी शिकवल्यानंतर तिला अजुन काहीतरी वेगळे म्हणजे comfort zone - घरापासून लांब  जाऊन करायचे होते.   त्यामुळे तिने Simple Education Foundation साठी पूर्णवेळ कार्यरत  रहाण्याचा निर्णय घेतला.  हृषिकेशजवळ गुलर या डोंगराळ-दुर्गम गावातल्या मुलाना ती शाळेत शिकवते.  सानिया लहानपणापासून भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहे.  सानियाचा जोडीदार गीत , Foliage मधें काम केल्यानंतर आता तो India Hikes मधें हिमालयात ट्रेक लीडर म्हणुन काम करीत आहे.  विशेष म्हणजे लग्नानंतर दोघे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे काम सुरूच ठेवणार, जोपर्यंत त्याना त्यांचे काम आवडत आहे तोपर्यंत. हे सांगितल्यावरही लोक विचारतात "ते सगळं ठिकाय, पण ते दोघे करतात काय?" अजुनहीँ लोकाना आवडीच्या क्षेत्रात काम करणे हा पगार मिळणारा पूर्ण वेळ जॉब असतो हेच पटत नाही.


लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय प्रसंग असतो , जरी खाजगी असला तरी.  आपल्याकडे त्याला परंपरागत जाहीर समारंभाचे स्वरूप देण्यात आलेले आहे, आता तर निमंत्रण पत्रिकांचेच बैनर, विचित्र प्री-वेडिंग फोटो शूट हे प्रकार वाढत चालले आहेत.   हे लग्न ज्यांचे असते त्याना काहीही न विचारता त्यांचेच आप्त-मित्र आपल्या संकल्पनेप्रमाणे किंवा परंपरेच्या लावलेल्या अर्थाप्रमाणे लग्नामधे आपापली हौस भागवुन घेतात.  त्यामुळे लग्नात वधुवर रहातात बाजूला, बाकीच्यांचीच हौसेमौज होते.  घरातले पहिले कार्य असो वा शेवटचे.


तर दोघांनी लग्न करायचे ठरवल्यावर कसे करायचे हा पहिला प्रश्न.  त्यासाठी निर्णय घेणारे  लोक जितके कमी तितके  सोपे.  त्यामुळे सानिया-गीत आणि पालक एका होटेलमधें भेटलो, तिथे ठरवले की लग्न कसे करायचे, कोठे, किती लोकाना बोलवायचे हे सानिया-गीत दोघेच ठरवणार.  उभयतांनी ठरवले की  लग्न रजिस्टर पद्धतीने  होईल. 17-12-17 ही लग्नाची तारीख, लग्नाचा हॉल-मेनू त्यानीच ठरवला.  रिसेप्शन मोजक्याच आप्तेष्टासाठी करायचेही ठरवले. त्या दोघाना बरेच पैसे वाचवून ती रक्कम जगभर फिरण्यासाठी वापरायची आहे. Don't explain.   Your friends don't need it, enemies won't  believe you - Paulo Coelho

नवयुवकांना निर्णय घेण्याचे हक्क दिले आणि त्यात परंपरेची बंधने नाहीत असा पाठिंबा दिला की ते उंच भरारी मारू शकतात.  त्यानीं घेतलेले निर्णय फारच वेगळे होते पण सर्वानी विचार करण्यासारखे होते.

- रिसेप्शनला स्वागतासाठी दारात ते दोघे हजर राहणार
- टिपिकल रिसेप्शनमधें स्टेजवर उभे राहून आलेल्या ओळखी-अनोळखी पाहुण्याना मित्रांना दोन मिनिटासाठी भेटणार नाहीत, तेच लोकात मिसळणार
- लग्नात ते एकमेकाला हार घालणार नाहीत.
- कोणताच कार्यक्रम Formality म्हणुन करणार नाही

या कार्यक्रमाचे निमंत्रणसुद्धा अगदी informal केले.  पत्रिका न छापता whatsup वर पाठवले. निमंत्रणात कुठेही कोणत्याही देवाचे नाव नाही, खाली निमंत्रक म्हणुन बच्चे कंपनीची नावे नाहीत, कंसामधें यांची नात, त्यांची पणती असा कोणीच न वाचला जाणारा  तपशील घातला नाही. कार्यक्रमाचे स्वरूप अनोखे असल्यामुळे वेळेवर या असा मजकूर आणि दोघे करियर काय करतायत याबददल तपशील लिहिला.

रिसेप्शनमधे 15 नातेवाइक, मित्र, मैत्रिणी यानी दोघांबद्दल आपापले मनोगत 3 मिनिटात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गीत-सानिया या दोघानी केले.  या अनोख्या कल्पनेमुळे वधु-वरांचा सर्वाना परिचय झाला, तो ही वेगळ्या पद्धतीने. सह-भोजनाच्यावेळेपर्यंत सर्वाना नवदांपत्याचे विविध पैलू समजले होते.  मनोगत व्यक्त केल्यानंतर गीतने सानियाला अंगठी घातली, सानियाने गीतच्या गळ्यात कॅमेरा घातला.  गीत उत्कृष्ट फोटोग्राफर आहे, ट्रेकिंग करताना त्याने काढलेले फोटो विलक्षण आहेत.  त्यामुळे हार घालण्याऐवजी ही कल्पना उपयोगी होती.

लग्नातच काय, नेहमीच "लोक काय म्हणतील याचा विचार कोणी करू नये" हेच महत्वाचे.  प्रत्येकाने रजिस्टर पद्धतीनेच लग्न करावे असे नाही पण आपण काय करत आहोत याचे भान कोणीच विसरु नये असे मला वाटते.  आपल्याकडे काही चुकीच्या परंपरा धार्मिक विधीच्या नावावर विचार न करता सुरु आहेत, उदाहरणार्थ...

- "कन्यादान" - शिकले सवरलेले पालक कन्यादान शब्द उच्चारतात कसे हाच प्रश्न आहे.
- मुलींच्या आई-वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांचे पाय धूणे - हौसेच्या नावावर ग्रामीण आणि शहरी भागात हे सुरूच आहे.
- चांगले शिकलेले लोक, एका मुलीचे पालक असून सुद्धा प्रश्न विचारतात "मुलगी कुठे दिली?".  मुलगा काय किंवा मुलगी काय, लग्नानंतर कोणी कोणाला देत नसतो.
- लग्नात आणि लग्नानंतर वधु वराना दिसेल त्याचे पाय धरावे लागतात हे वाईट. नमस्कार कोणाला करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. एखादा माणुस पटला, त्याचे मोठेपण पटले तर कोणालाही सांगावे लागत नाही, आपण होऊन कोणीही नतमस्तक होणारच. तोच खरा नमस्कार.


लग्नानंतर मी बऱ्याच लोकांकडून ऐकलेला प्रश्न......

- "आता जबाबदारीतून मोकळा झालास ना?"
- "नाही, लग्नापूर्वीही मला सानियाचे कसे होणार अशी चिंता नव्हती, आता मोकळा झालो असेही वाटत नाही"
- "असं कसं, आता तुझी काळजी मिटली ना?"
- "मिटली म्हणता येईल, वाढली म्हणता येईल पण सुटका झाली, असे मला वाटत नाही."
- "तरीही आता तू मोकळा झालास, मनाला येईल ते करू शकतो"
- "त्यात क़ाय, सानियाच्या लग्नाआधी 3 दिवस मी सालाबादप्रमाणे सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावली आणि रोज त्याचा वृत्तांतही लिहिलाय"


असो.  तर असे हे वेगवेगळे अर्थ लग्नात लावले जातात, मुलीच्या लग्नात तर जास्तच.  सानिया काही महिन्यापूर्वी करियरच्या निमित्ताने बरीच लांब गेली त्यामुळे ती जवळपास नसण्याची मनाची तयारी करत होतो.    तिच्याबद्दल अधिक काही लिहिण्यापेक्षा  तिच्या आवडत्या गाण्याची आठवण....



(गीत - स्वानंद किरकिरे, संगीत - राम संपथ).



ओ री चिरैया

नन्ही सी चिड़िया

अंगना में फिर आजा रे





अंधियारा है घना और लहू से सना
किरणों के तिनके अंबर से चुन के
अंगना में फिर आजा रे
हमने तुझपे हज़ारों सितम हैं किये
हमने तुझपे जहां भर के ज़ुल्म किये
हमने सोचा नहीं
तू जो उड़ जायेगी
ये ज़मीन तेरे बिन सूनी रह जायेगी
किसके दम पे सजेगा अंगना मेरा



लग्नानंतर फक्त मुलीच्याच आईं वडिलांना वाईट वाटते असे काही नाही, मुलाच्याही आईं वडिलांना वाटत असेल कारण लग्नानंतरच तर  मुले (दोघे) स्वतंत्र होतात, आता ते सर्व निर्णय एकमेकांच्या सल्ल्याने घेणार, त्यासाठी त्याना आपल्यावर अवलंबून न ठेवता त्यांचे बोट सोडणे हाच सगळ्यांच्या सुखाचा मंत्र, जगदीश खेबुड़कर यांच्या भाषेत...



(संगीतकार-गायक - सुधीर फडके)



 

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा
तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा
घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा
तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा
कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा


सानिया आणि गीत दोघांना हक्क व जबाबदारीच्या 50 टक्के भागीदारीसाठी आणि आयुष्यभराच्या सह-प्रवासासाठी शुभेच्छा


सुहास किर्लोस्कर






Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास