घर आजा घिर आ
मालगुंजी राग म्हणजे काय ? अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बागेश्री रागात शुद्ध गंधारचा आरोहात वापर. बागेश्री राग ओळखण्याचे गाणें "राधा ना बोले ना बोले रे". आरोह आणि अवरोह म्हणजे जाताना आणि परत येताना म्हणायचे स्वर. सिनेसंगीतामधे रागावर आधारीत गाणी तयार केली जातात तेव्हा हे सर्व नियम पाळले जातीलच असे नाही. तरीही राग ओळखताना काही गाण्याशी मिळते जुळते स्वर शोधायचा प्रयत्न केले की लक्षात येते "पायल बाजे मोरी झांझर", "जा रे, बलम तोसे नही बोलू" या बंदिशीची सुरावट "राधा ना बोले" सारखी आहे म्हणजे हा राग बागेश्री असावा. असे ऐकले की "हमसे आया न गया", या गाण्यात बागेश्री सापडतो. अशा बागेश्री मधें शुद्ध गंधारचा वापर केला की मालगुंजी होतो. म्हणजे जाताना रागेश्री (कौन आया मेरे मन के द्वारे) आणि परत येताना बागेश्री (जाग दर्द ए इश्क़ जाग)...खमाज थाटातील या रागात आपल्याला जयजयवंती रागातील छटाही दिसतात. "नैन सो नैन नाही मिलाओ", "ना जिया लागे ना", "जीवन से भरी तेरी आंखे", "उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहेते" ही मालगुंजी रागावर आधारीत गाणी. ही गाणी ऐकली तर पंचमच्या या गाण्याचे वेगळेपण लक्षात येते.
सिनेसंगीतामधे रागातील स्वरांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे प्रत्येक संगीतकार कसा विचार करेल आणि स्वातंत्र्य कसे वापरेल यावर गाण्याचे वेगळेपण दिसते. राहुल देव बर्मन यानी तर शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी करतानाही बरेच प्रयोग केले. दोन वेगवेगळ्या रागांचे मिश्रण केलेले सचिन देव बर्मन यांना आवडायचे नाही. पण राहुल देव बर्मन यानी हे केलेच शिवाय इथेच न थांबता वेगळ्या धाटणीचे राग एकत्र आणून अतिशय मधुर आणि सदाबहार गाणी तयार केली आहेत. खमाज (रात्र प्रहर) आणि तोडी (पहाट) या वेगळ्या वेळेला गायल्या जाणाऱ्या रागांच्या स्वरांचा वापर करून "रैना बीत जाए" हे अप्रतीम गाणे केले आणि ऐकताना त्यात आपल्याला काही वावगे वाटले नाही.
27 जुलै 1939 या दिवशी जन्म झालेल्या राहुलने 1961 साली म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी मेहमुदच्या छोटे नवाब या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले. शैलेन्द्र यानी लिहिलेल्या "घर आया घिर आ" या गीताची चाल मालगुंजी रागावर आधारीत आहे. राजू भारतन यानी असा रागावर आधारीत गाण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा पंचमदा म्हणाले "गाण्याची धुन तयार करताना आता मी या रागावर एक धुन करतो असा विचार करत नसतो, चाल/धुन सूचते, गाणें तयार होते आणि नंतर तुम्ही लोक ते कशावर आधारीत आहे याचा शोध लावत बसता". खरे आहे.
बाहेर नभ ऊतरु आले आहे, नभ मेघानी आक्रमीले आहे, मधेच वीज चमकत आहे, मला भिती वाटत आहे, राजसा, तू लवकर घरी ये, अशी विनवणी या शब्दात आहे.
मेहमुद आणि अनवर हुसेन नृत्य बघायला बसले आहेत, तिकडे घरी अमिता एकटी वाट पहात आहे. रूपक तालातल्या (7 मात्रा) या गाण्यात घुंगरांचा वापर यथोचीत म्हणजे आवश्यक तेथेच कसा केला आहे, यासाठी ऐकावे. लता मंगेशकर यानी हे गाणें सुरेल गायले हे तर आपण सर्वच जाणतो पण गाण्याची स्केल (पट्टी) प्रसंगाप्रमाणे खालची आहे हे विशेष. गाण्यातले पॉझेस ऐकण्यासारखे. प्रसंगा प्रमाणे वाद्यांचा, शांततेचा वापर हे संगीतकाराचे कौशल्य या गाण्यात प्रकर्षाने जाणवते.
घर आजा घिर आये बदरा साँवरिया
मोरा जिया धक धक रे चमके बिजुरिया
बिजुरियाच्या वेळेस घुंगरू सुरु होतात, तिथेच थांबतात कारण काही वेळ नृत्य तर काही वेळ बसून गाणें ऐकविणे असा माहोल असल्यामुळे तो विचार करून घुंगराचा उपयोग केला आहे.
घरी मी एकटी आहे, हा एकटेपणा जीवघेणा आहे, "तेरे बिना जिया जाए ना" अशी अवस्था झाली आहे.
सतार वाजते त्याच वेळेस अमिता वाट पहात आहे हे दृश्य दिसते, कट.....पुन्हा "शिला वाझ"च्या नृत्याचा शॉट...त्याच वेळेस सारंगीं-घुंगरू वाजतात. कट....खिड़की पे...या ओळीच्या वेळेस कॅमेरा अमिताच्या घरी... खिड़कीमधें (इथे घुंगरू वाजत नाहीत)
सूना सूना घर मोहे डसने को आये रे
खिड़की पे बैठी बैठी सारी रैन जाये रे
टप टिप सुनत मैं तो भई रे बाँवरिया
टप टिप...या वेळेस पॉझ....अमिताच्या डोळ्यातले अश्रु....पुन्हा मुखडा सुरु होतो तेव्हाच घुंगरुचा आवाज. गाणें आधी रेकोर्ड केले आहे, नंतर चित्रीकरण केले आहे म्हणजे संगीतबद्ध करताना चित्रीकरणाचा कसा आणि किती विचार केला असेल !!!
सतार...सारंगीं....घुंगरूच्या आवाजात आपण तिची कैफियत ऐकतो, तुझ्याकडे डोळे लावून बसले, तू अजुन आला नाहीस, आपल्या नात्याला ही कोणाची दृष्ट लागली? येशील कधी परतुन, जिवलगा....
कसमस जियरा कसक मोरी दूनी रे
प्यासी प्यासी अँखियों की गलियां है सुनी रे
जाने मोहे लागी किस बैरन की नजरिया
घर आजा घिर आ s s sए
कोणतेही गाणें एका रागावर आधारीत गाणें आहे हे समजल्यावर आपण आदराने बोलतो पण कुणी सांगितले की एखादे गाणें विदेशी गाण्याच्या धुनवर आधारीत आहे, तर तोच अभिमानाचा स्वर लगेच बदलून हेटाळणीचा होतो..... आपणही किती दुटप्पी असतो !!
आता याच छोटे नवाब मधली इतर गाणीसुद्धा सुरेख आहेत आणि वेगवेगळ्या संगीत प्रकारातील आहेत. "मतवाली आँखोंवाले" (जाझ -केस्टनेट-क्लब म्युझिक), "इलाही तू सुन ले हमारी दुवा" (शांतता, कमीत कमी वाद्यांचा वापर), पण पुरस्कार देणाऱ्या लोकाना जसे एसडी यांचा गाईड पुरस्कार देण्यायोग्य वाटला नाही, तसेच आरडीचे अष्टपैलूत्व समजले नाही, त्याना रैना बीत जाए, घर आजा घिर आये, बिती ना बिताई रैना मधले क्लासिकल ऐकू आले नाही, कारवाँ, तिसरी मंझील, जवानी दिवानी मधले प्रयोग समजले नाहीत. त्याची भरपाई म्हणुन आरडीच्या पश्चात फिल्मफेयरने युवा संगीतकारासाठी राहुल देव बर्मन पुरस्कार सुरु केला. पण "बूंद से गयी वो...."
कोणत्याही संगीतकाराबद्दल एक गाणें ऐकून मत बनवता येत नाही तरीही आपली मते आपण लोक कसा शिक्का मारतात त्यावर ठरवतो. अलिकडेच एक सिनेसंगीत अभ्यासक म्हणाले "शोले संगीतमय चित्रपट नव्हता"... बहुतेक पार्श्वसंगीताला ते संगीत मानत नसावेत. असो. मला त्यांच्याइतके संगीतामधले समजत नाही हेच बरे आहे. असे चश्मे काढले की समजते, क्लासिकल आरडी वेगळा (शर्म आती है मगर..), नवनवीन तालवाद्यांचा चपखल वापर करणारा पंचम वेगळा (सामने ये कौन आया, चुनरी संभाल गोरी), रिदमचा वापर करणारा राहुल वेगळा (तेरे बिना जिया जाये ना), मिक्स रिदमचे नवनवीन प्रयोग करणारा आरडी वेगळा (एक लड़की को देखा तो ऐसा लगा), सरोद-सतारचा क्लासिक वापर करणारा आरडी बर्मन वेगळा (आंधी, किनारा), आवाजावर प्रयोग करणारा पंचम वेगळा ( आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, जा ने जा ढूंढता फिर रहा)....आणि तरीही आपण एक लेबल शोधतोय त्या अवलिया कलाकारासाठी....
काही अवलिया काळाच्या पुढे असतात आणि आपल्याला त्यांचा हुनर त्यांच्या पश्चात समजतो. आज 4 जानेवारीच्या निमित्ताने नित्यनवे प्रयोग करत रहाणाऱ्या राहुल देव बर्मन याना पुन्हा एकदा सलाम....
✍ सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment