खोलो खोलो दरवाज़े





शिक्षण म्हणजे शिक्षकानी द्यायचे आणि विद्यार्थ्यानी घ्यायचे एवढेच नसते, ती दोघांचीं शिकण्याची प्रक्रिया असते.   पण किती शिक्षक शिकायला तयार असतात?   शाळेत आणि शाळेतले जे मिळते तेच आणि तेवढेच  शिक्षण आहे का ? कला हा विषय तर शाळेतुन हद्दपार झालां आहे.  त्यांमुळे कला हा अभ्यासाचा विषय होता तो एक फावल्या वेळात करायचा छंद झाला आहे.

तारे जमीन पर या सिनेमात निकुंभ सर डिस्लेक्सिया झालेल्या विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने शिकवतात, ईशानचा प्रश्न क़ाय आहे, त्यालां नक्की क़ाय जमत नाही आणि तो कशात चांगला आहे हे लक्षात घेऊन. चित्रकला हा इशानचा आवडता विषय.  निकुंभसर त्याचीच स्पर्धा  भरवतात, सर्व विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा.  ही स्पर्धा सुरु असते तेव्हाचे हे विलक्षण गीत, ऐकण्यासारखे आणि बघण्यासारखे.

गीतकार प्रसून जोशी यांचे समर्पक शब्द सिनेमाची भाषा बोलतात आणि शिक्षण कसे असावे हे पण सांगतात. शंकर एहसान लॉय यांचे उरकृष्ठ संगीत.  गिटारने गाणें सुरु होते....कॉर्डवर एक रिदम वाजत रहातो, त्याचीच एक धुन वाजत रहाते

खोलो खोलो दरवाज़े, पर्दे करो किनारे
खुंटे से बँधी है हवा, मिल के छुडाओ सारे

ज्ञानाची कवाड़े उघडा, डोळ्यावरची झापडे काढ़ा, बाजूला करा ते पडदे, सर्वजण मिळून  लावलेली खूंटी काढून जरा मोकळी हवा येण्यासाठी प्रयत्न करू.

ईशान लक्षपूर्वक चित्र काढत आहे, चित्र काढण्यात तो असा काही मग्न झाला आहे की त्याच्या पालकांचा विश्वास बसणार नाही.  आवडती गोष्ट करायला लक्ष दे अस सांगावे लागत नाही.....प्रश्न एवढाच आहे की शाळेत आवडत्या गोष्टी करायला मुभा असते का?
The only thing that interferes with my learning is my education.- Albert Einstein


आजाओ पतंग लेके, अपने ही रंग लेके
आसमान का शामियाना, आज हमें है सजना

या रे सगळेजण पतंग घेऊन या, आपल्याच आवडीचा रंग घेऊन या, आपण पूर्ण क्षितिज रंगवुन सजवू.

शाळेतली मुले चित्र काढत आहेत. आपले व्यक्तिमत्व आपण काढत असलेल्या चित्रात उमटते.  गणिताचे शिक्षक चित्र काढतात त्यात भूमितिच्या आकृत्या दिसतात.  इंग्रजीचे शिक्षक English letters वरुन चित्र काढतात. स्वैर चित्रे काढण्यात हिच गम्मत आहे पण शाळेत अशी मुभा मिळत नाही. शिक्षकांच्या कल्पनेतले चित्र काढले तरच मार्क मिळतात आणि मगच पालक खुश.

क्यूँ इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू
दुनिया सजी तेरे लिए, खुद को ज़रा पहचान तू

अरे मुला, तू असा निराश-नाराज का झालास,  हे जग तुझ्यासाठी सजले आहे, स्वतःला ओळख, तूझ्यामुळे हे जग रंगबिरंगी झाले आहे.

निकुंभ सरानी पण चित्र काढायला सुरुवात केली आहे, 

तू धूप है, झम से बिखर, तू है नदी.. बेख़बर
बह चल कहीं, उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ.. 
तेरी तो मंज़िल है वहीं..

तू असा खळखळत्या नदी सारखा वहात रहा, सूर्यप्रकाशासारखा  पसरत रहा, उड़त रहा स्वैर..जिथे तुला आनंद वाटतो, जे तुला आवडतें ते कर....असे केलेस तर तुला जे आवड़ते ते मिळेल.


बासी ज़िंदगी उदासी, ताज़ी हँसने को राज़ी
गरमा गरमा सारी, अभी अभी है उतारी
हो ज़िंदगी तो हैं बताशा, मीठी मीठी सी है आशा
चख ले रख ले, हथेली से ढक ले इसे

प्रसून जोशी यांचे शब्द शाळेच्या भाषेला साजेसे.

तू असा उदास होऊ नकोस...अशा उदास आयुष्याला काही अर्थ नाही. आयुष्य कसे ताजेतवाने पाहिजे...हसायला केव्हाही तयार असलेले.  आयुष्य हे बत्ताशासारखे स्वादिष्ट आहे, चाखत आनंद घे, हातात झाकुन ठेव.

तुझ में अगर प्यास है, बारिश का घर भी पास है
रोके तुझे कोई क्यों भला, संग संग तेरे आकाश है

तुला तहान लागली असेल तर पावसाचे घर जवळच आहे.  तुला ज्या गोष्टीचा ध्यास आहे, ती मिळेल,  तुला कोणी थांबवू शकत नाही, तुझ्याबरोबर हे सर्वदूर पसरलेले आकाश आहे.

सगळी मुले मनाप्रमाणे आपले आकाश आपापल्या अवकाशात रंगवत आहेत.  ईशानच्या डोळ्यासमोर त्याचे चित्र आहे, तो दिलखुलासपणे एकाग्र चित्ताने रंग भरतो आहे. शिक्षकाना प्रथमच उमगले आहे यात क़ाय आनंद आहे.  आपल्याकडे शिक्षकांची छडी गेली पण मी सांगतो तसेच कर असे शिकवायची मगरूरी गेली नाही अजून.

खोलो खोलो दरवाज़े, पर्दे करो किनारे
खुंटे से बँधी है हवा, मिल के छुडाओ सारे

खुल्या वातावरणामधें शिक्षक मुलाना विचारत आहेत, कसे आहे माझे चित्र, मुलेही कौतुक करत आहेत, चित्र कसेही असले तरी..... हे शिक्षकाना कधी कळणार ?

खुल गया.. आसमान का रस्ता देखो खुल गया
मिल गया.. खो गया था जो सितारा मिल गया
रोशन हुई सारी ज़मीन, जगमग हुआ सारा जहाँ
हो उड़ने को तू आज़ाद है, बंधन कोई अब है कहाँ

खुल्या आकाशाकडे जायचा रस्ता सुरु झाला. जे हरवले होते ते गवसले आहे.  जमिनीवर सगळीकडे प्रकाश पडला आहे.  सगळीकडे झगमगाट झाला आहे.  आता तुला काहीच बन्धन नाही, तू आता कुठेही उडण्यासाठी स्वतंत्र आहेस.

इशानच्या मनातले चित्र साकार झाले आहे, तळ्याकाठी तो बसला होता तेव्हाच सगळे रंग मनात साठवले होते त्याने.  मग त्याला आठवण होते ती लाडक्या निकुंभ सरांची, त्याना  चित्र दाखवायचे आहे. निकुंभ सर अवाक आणि बेहदद खुश !! आता ईशानलां प्रश्न पडलेला आहे की निकुंभ सरानी कसले चित्र काढले असेल?  कॅमेरा इशानच्या नजरेने चित्रामागुन पुढे येतो आणि ईशानला आपल्याला निकुंभ सरांचे चित्र दिसते.....हा तर हसणारा ईशान. 


आपल्याला वाटते की नविंन गाण्यात खुप संगीताचा गोंगाट असतो. पण तसे नाही. जग सुंदर आहे, आताचे संगीतसुद्धा सुंदर श्रवणीय आहे. तुम्ही क़ाय ऐकता, क़ाय बघता त्यावरच अवलंबून आहे.  कोणताही अभिनिवेश बाळगता, कोणताही चष्मा घालता खुल्या मनाने सर्व ऐकावे.   शास्त्रीय, उपशास्त्रीय, जुने, नवे, भारतीय, पाश्चात्य...पूर्वीचे दिवस राहिले नाहीत असे रोज म्हणत जगलो तर चांगले काहीच दिसणार नाही.  Positive approach सगळीकडे असावा, प्रोफेशनल आणि व्यक्तिगत जीवनामधे, छंदामधे, कला जोपासताना.  पूर्वी रेडियो होता सर्व प्रकारचे संगीत कानावर पडायचे.  आता आपल्याला प्रयत्न करावे लागतात.



दिग्दर्शक आमिर खान-अमोल गुप्ते, दर्शनील सफारी, अभिनेता अमीर खान सर्वाना सलाम !!  गायक - शंकर महादेवन, डोमिनिक, विव्हियन.  गायक, संगीतकार, गीतकार यांचे असेकाही टीमवर्क जमले आहे, क्या बात है. 

तू धूप है झम से बिखर, तू है नदी बेख़बर
बह चल कहीं, उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ
तेरी तो मंज़िल है वहीं......

कोरसचा फार सुरेख वापर.  शंकर एहसान लॉय ! शब्द अपूरे आहेत संगीत दिग्दर्शनाबद्दल लिहायला.  कोणतीही कलाकृती पुरेपुर वेळ देऊन फुर्सतीने तयार केली तर उत्कृष्ठ होतेच, मग ते इशानचे चित्र असो वा आमिर खानचा सिनेमा.......तारे जमीन पर.



सुहास किर्लोस्कर

Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास