मैं थी, मैं हूं, मैं रहूंगी......
ख्यातनाम गीतकार साहीर लुधियानवी यानी 1958 साली लिहिलेल्या गाण्याचे शब्द अजुनही बदलावे लागत नाहीत यात अभिमान वाटावा की वैषम्य ?
औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया
स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक हा एक अत्याचारच आहे. असे प्रकार खुप लांब होतात असे नाही, आपल्याच आजुबाजुला डोळे उघडे ठेवून बघितले तर बरेच काही लक्षात येईल. जेथे एक मुलगा आणि एक मुलगी असते तेथे कोणीही घरी आले की पाहुण्याना पाणी देणारी मुलगी असते, मुलाला तसे सांगितले जात नाही. कन्या पुस्तक वाचत आहे आणि चिरंजीव घरातला केर काढत आहे हे चित्र कुणी बघितलय ? जेवण झाल्यावर स्वतःचे ताट आपण उचलतो का? निदान रोजचा पहिला चहा तरी पुरुष करतो का? स्वयंपाक मुलींच्या बरोबरीने मुलानां शिकवला जातो का? जेवण बनवायला येते का या प्रश्नाला सामोरे जावे लागते ते मुलीनाच. विचारणाऱ्या महिलाच असतात हे विशेष. साहीर म्हणाला ते खरेच आहे. एकीकडे आपण स्त्रीला दुर्गा म्हणुन पूजतो आणि लगेच घरी आल्यावर कधीच सुट्टी नसलेल्या स्त्रीला चहा देण्याचे फर्मान सोडतो.
साधना सिनेमासाठी साहीर यानी हे अप्रतीम काव्य लिहिले आणि आपण स्त्रियांना देणाऱ्या वागणुकीत अजुनहीँ फार काही बदल न झाल्यामुळे अजरामर झाले. एन दत्ता यांचे संगीत प्रसंगाला अनुरूप दिले आणि लता मंगेशकर यानी गाण्यातला भाव जाणून तितक्याच समरसुन गायले.
तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज़्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज़्ज़तदारों में
हे तर आपल्याकडे पुर्वापार चालत आले आहे.....मातेची आज्ञा प्रमाण मानून "जिंकून" आणलेल्या द्रौपदीची वाटणी असो वा धोब्याची भाषा प्रमाण मानून पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावणे असो....अन्याय स्त्रियांच्यावरच.
मर्दों के लिये हर ज़ुल्म रवाँ, औरत के लिये रोना भी खता
मर्दों के लिये लाखों सेजें, औरत के लिये बस एक चिता
मर्दों के लिये हर ऐश का हक़, औरत के लिये जीना भी सज़ा
स्त्रीने मद्य घेतले तर केवढा गहजब, केवढी चविष्ट चर्चा...आणि हा गोंधळ घालणारे कोण, स्टेटस सिम्बोल किंवा मर्दानगी म्हणुन अभिमानाने पिणारे. दारू पिउन गाडी फुटपाथवर घालुन इतरांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेला पुरुष अजुनही मान मरातब मिळवतो आहे. इंग्रज आणि राजा राममोहन रॉय यांच्या कृपेने सतीप्रथा बंद झाली अन्यथा इथल्या धर्ममार्तंडांनी अजुनही सुरूच ठेवली असती.
जिन होठों ने इनको प्यार किया, उन होठों का व्योपार किया
जिस कोख में इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया
जिस तन से उगे कोपल बन कर, उस तन को ज़लील-ओ-खार किया
मर्दों ने बनायी जो रस्में, उनको हक़ का फ़रमान कहा
औरत के ज़िन्दा जलने को, कुर्बानी और बलिदान कहा
इस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा
रस्मे म्हणजे रुढी, परंपरा....जे बनवणारे पुरुष होते...आहेत. त्यानीच बरेच उपास-तापास स्त्रियांच्या माथी मारले, स्त्रियांची अवहेलना करणारी वेगवेगळ्या गुरुची कालबाह्य चरित्रे-पोथ्या अजुनहीँ पारायण या स्वरुपात वाचल्या जातात, स्त्रियानी कसे वागावे, नवऱ्याबरोबर वाद घालु नये, सती जाणे हे पुण्यकर्म, पतीने बैस म्हणुन सांगितल्या शिवाय बसु नये, असे उपदेश असलेले ३१ वे आध्याय अर्थ न समजता लोक वाचतात, महिलांना वाचायला लावतात. मंगळसूत्र घालण्याचे बंधन फक्त स्त्रियांनाच का आहे तर त्याची विनोदी कारणे दिली जातात की वाट्यामधें फार मोठी शक्ती असते वगैरे...थोड़ी असल्या बंधनाची शक्ती पुरुषाना का देत नाही, यावर उत्तर नाही. घरातील "रीती रिवाज" पाळण्यासाठी अजुनहीँ कमावत्या स्त्रीला रजा टाकावी लागते यात सर्व काही आले. त्या पाच दिवसात अजुनही दुय्यम वागणूक दिली जाते, अपवित्र समजले जाते, ते ही शहरात....गावात काय होत असेल याची कल्पना केलेली बरी. त्या पाच दिवसात देवीच्याही देवळात का जाता येत नसेल हे कोडे आहे........विचार केला तर.
बुभुक्षित नजरा पुरुषाच्या पण बुरखा मात्र स्त्री ला. बऱ्याच शिव्या घरातल्या स्त्रियांवर असतात, त्या शिव्या त्वेशाने देण्यात पुरुषार्थ मानला जातो. "मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत" हे वाक्य बरेच सुशिक्षित पुरुष प्रौढीने उच्चारतात. मुलगी या घरात "दिली" असे अजुनहीँ सांगणारे सुशिक्षित पालक आहेत, या वाक्यात काही गैर आहे असे त्याना वाटतच नाही.
अजुनहीँ बऱ्याच ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी वेगवेगळी बैठक व्यवस्था बऱ्याच गावात असते म्हणजे सभागृहाच्या एका बाजूला पुरुष, दुसऱ्या बाजूला स्त्रिया. वडील आपल्या मुलानां सांगत असतात, "माझ्याबरोबर येणार आहेस की बायकांच्यात बसणार आहेस?" यावर मुलगा सहाजिक वडिलांच्या बरोबर जातो पण ते वाक्य मुलाच्या मनावर कायम कोरले जाते की बायकांच्या बरोबर बसणे कमी दर्जाचे आहे.
अर्थात हे सर्वसाधारण प्रसंग झाले. स्त्रियांना लहानपणापासून अशा प्रसंगातून जाण्याचे सामर्थ्य ठेवावे लागते. तारुण्यात पदार्पण करताना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ज्या गोष्टीबद्दल घरात खुली चर्चा होणे आवश्यक असते त्याच दडपल्या जातात. दहावीच्या पुस्तकात शास्त्रात शेवटचे तीन धडे शरीर शास्त्रावर आहेत. आयुष्यासाठी महत्वाचे असणारे हे धडे बऱ्याच शाळात पुरुष शिक्षक मुलानां आणि शिक्षिका मुलींना शिकवत नाहीत, "तुमचे तुम्ही वाचा आणि समजून घ्या" असा उपदेश दिला जातो. मुलींचे प्रश्न अनुत्तरित रहातात. बऱ्याच मुली प्रश्नच विचारत नाहीत कारण त्यांची जडणघडण तशीच केलेली असते. यातून तावून सुलाखुन त्या शिक्षण पूर्ण करतात. वेगवेगळ्या अग्निदिव्यातून जाताना त्यांचे लग्न ठरवले जाते. योनीशुचितेच्या चुकीच्या पुरुषी संकल्पनातून त्याना कौमार्यचाचणी वगैरे परीक्षा द्याव्या लागतात त्या वेगळ्याच. अशाच विषयावर महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित "अस्तित्व" हा नितांत सुंदर चित्रपट पुन्हा बघावा. तब्बू आणि सचिन खेडेकर यांचा अप्रतीम अभिनय, बांधिव कथा-पटकथा आणि राहुल रानडे यांचे संगीत. सिनेमातले हे शेवटचे गाणें विविध अग्निपरीक्षामधून तावून सुलाखुन निघालेल्या महिलांसाठी...
संगीतकार राहुल रानडे यानी कोरस आणि सैक्सोफोन यामधुन चांगला परिणाम साधला आहे.
गीतकार - श्रीरंग गोडबोले
गायिका - कविता कृष्णमूर्ती
ना कटूँगी ना जलूँगी, ना मिटूंगी ना मरूँगी
मैं थी मैं हूँ मैं रहूंगी
जब तक दरिया में है पानी, और आसमान नीला है
जब तक सूरज तेज से चमके, और अंधेरा काला है
कब तक इस जहां का बनके प्राण रहूँगी
जिस पे टूट पड़ी सदियों से, हर वोह लहेरे सागर की
मैं वह अविचल शिला हुन, पर आफत है जिसने झेली
जीने की अविनाशी चाह का अंश बनूँगी
भारतीय संस्काराच्या गप्पा मारण्यात आपणच पुढे असतो. कोणीही बघत नसताना आपण कसे वागतो त्याला संस्कार म्हणतात....culture या अर्थाने. आपले संस्कार ट्रैफिक सिग्नलला पोलिस नसताना दिसतात. सोफ्यावर बसून घरातल्या स्त्रियांना पाणी मागताना दिसतात, "बायकांसारखे काय रडतोस" असे म्हणताना दिसतात. समान वागणूक वगैरे अजून खुप लांबच्या गोष्टी आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने होणारा एका दिवसापुरता उदोउदो टाळून आपण रोजच्या जीवनात काय करू शकतो याचा विचार केला तर बरेच काही करण्यासारखे आहे. सुरूवात स्वतः पासून करायला हवी.
Comments
Post a Comment