मेरे अंगना आये रे घनश्याम आये रे



आशा भोसले, गुलजार आणि राहुल देव बर्मन या तिघांची गाणी एकापेक्षा एक सरस आहेत. किनारा, खुशबू, दिल पड़ोसी है, खूबसूरत.....ही यादी वाढत जाते आणि एक गाणें निवडणे मुश्किल होते.  नरम गरम हा अमोल पालेकर, उत्पल दत्त आणि स्वरूप संपत यांचा सिनेमा, हृषिकेश मुखर्जी यानी दिग्दर्शित केला.  अतिशय सुरेल आणि श्रवणीय गाणी हे या सिनेमाचे वैशिष्ट्य.   आशा भोसले यानी गायलेले गाणें, त्यातल्या गाण्याच्या अदा, अभिनय, गुलजार यांचे शब्द आणि राहुल देव बर्मन यांचे सुरेल संगीत, गाणें पुनःपुन्हा ऐकायला भाग पाडते.

घनश्यामला उद्देशुन असलेली बरीच गाणी प्रियकरासाठी असतात, म्हणजे एका दगड़ात दोन पक्षी !!

आशा भोसले यांच्या आलापीने गाणें सुरु होते, तबल्यावर अद्धा तीनताल. "मैने सारे होश गवाए" हे ऐकल्यावर असे वाटते की असे फक्त आशा भोसलेच गाऊ शकतात. 

मेरे अंगना आये रे घनश्याम, आये रे
मैं ने सारे होश गँवाये
मेरे अंगना आये रे, घनश्याम

"मेरे अंगना" असे शब्द पुन्हा येतात तेव्हा तिश्रमधें धात्रक धिकीट वाजते त्याचा surprise element सुखद धक्का देतो, अगदी मँगों फ्लेवर आइसक्रीममधें खरा आंबा लागल्यासारखा !!  खूबसूरत सिनेमातील पिया बावरी या गण्यातील जागासुद्धा अशाच.



होश गवाए ही जागा प्रत्येक कडव्याला वेगळी, त्याचीच नशा चढ़त जाते गाणें ऐकताना. घनश्याम आए रे, मैंने सा s s s रे होश गवाए, या जागा प्रत्येक वेळी वेगळ्या आहेत, लक्षपूर्वक ऐकले कि दाद देतोच आपण.

दिडपट लयीमधे वाजवलेल्या सतार, व्हायोलीन, बासरी या वादयाची सुरावट गाण्याची खुमारी वाढवते, राहुल देव बर्मन यांचे तालावर असलेले प्रभुत्व अधोरेखित करते.

लाज के मारे सिमटी जाऊँ
आँचल ही से लिपटी जाऊँ
मेरा आँचल उड़ उड़ जाये

विरोधाभास दाखवून काव्य खुलवणे हे गुलजार यांचे वैशिष्ट्य - लाजुन पदरामधे तोंड लपवावे असे वाटते तर पदरच उडून जातोय !!

मेरे अंगना आये रे घनश्याम, आये रे
मैं ने सारे होश गँवाये
मेरे अंगना आये रे, घनश्याम

सतार आणि सारंगी यांचे एकमेकाला पूरक वादन, गाण्यातले रंग खुलवते.

सुध बुध खोई मन घबराये
इक रंग आये इक रंग जाये
मन बैरी बोल सुनाये

गुलजार लिहितात शुद्ध हरपली आहे,  मन बावरले आहे, लाजुन कावरे बांवरे होते, चेहऱ्यावर रंग बदलतात, मनात क़ाय आहे ते लपवून ठेवताच येत नाही. त्यामुळे "मन बैरी बोल सुनाये"


मेरे अंगना आये रे घनश्याम, आये रे
मैं ने सारे होश गँवाये
मेरे अंगना आये रे s s
घनश्याम आये रे s s s s

हृषिकेश मुखर्जी यानी एकाहुन एक सरस् चित्रपट दिग्दर्शित केले पण शेवटी त्यांचाही एक फॉर्म्युला बनत गेला त्यांमुळे बहुदा नरम गरम (1981) कमी रसिकांच्या लक्षात राहिला.  शिवाय अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांची गोलमाल जुगलबंदी पुन्हा घडवून आणायची असे ठरवून हा सिनेमा काढला असे वाटत रहाते. अर्थात उत्पल दत्त यांच्यासाठी तरी हा चित्रपट एकदा बघावा.

राहुल देव बर्मन यानी सिनेमाच्या कथा-रंग-रूप याप्रमाणे संगीत दिले.  म्हणजे हृषिकेश मुखर्जी यांचा आरडी वेगळा, गुलजार यांचा वेगळा, नासिर हुसैन यांचा वेगळा. त्यांची गाणी ऐकताना शास्त्रीय संगीत, विविध वाद्यांचा चपखल वापर, पाश्चात्य संगीत, लोकसंगीत यांचा सुरेल वापर केला आणि काळाच्या पुढचे संगीत देऊन रसिकांचे कान तयार केले.  पंचमदा यांचे बचना हसीनो पण श्रवणीय, रैना बीत जाए - सखी राधिके बावरी हो गयी सुरेल, जा ने जा ढूंढता फिर रहा पुनःपुन्हा ऐकण्यासारखे आणि मेरे अंगना आये रे....का लक्ष देऊन ऐकले नाही असा प्रश्न विचारणारे.  इतक्या वर्षानंतर ती गाणी श्रवणानंद देतात आणि नविंन काहीतरी सापडते.

राहुल देव बर्मन  यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वेगळे गाणे. जे विस्मृतीत गेलेले असतात त्यांची आठवण काढतात.  पंचमदा यांच्या बाबतीत ते शक्य नाही !!



सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास