अर्ज़ियाँ....अर्थात - तुझे आहे तुजपाशी....




सूफी संगीताचा प्रकार म्हणजे क़व्वाली. सर्वात लोकप्रिय क़व्वाली "ना तो कारवाँ की तलाश है" बद्दल यापूर्वीच्या लेखात लिहिलय. क़व्वाली अर्थासह समजून ऐकताना वेगळाच आनंद मिळतो आणि आपल्याला जाणीव होते की इतके दिवस आपण अर्थाकडे दुर्लक्ष केले किंवा जितके लक्ष द्यायला हवे होते तेवढे दिले नाही. या लेखाला प्रतिक्रिया देताना एक नवीन क़व्वाली अर्थ समजून ऐकण्यास मला माझी कन्या सानियाने सांगितले आणि अर्थ समजल्यावर पुन्हा तसेच वाटले की आपण लक्षपूर्वक ऐकत नाही. 


अर्जियां. दिल्ली 6 चित्रपटासाठी ही क़व्वाली ए आर रेहमान यानी संगीतबद्ध केली, त्याचा सूफी बाज सांभाळून. क़व्वालीचे चित्रीकरण दिल्लीच्या जामा मशिद परिसरात झाले आहे. कैलाश खेर आणि जावेद अली यानी परमेश्वराला दिलेली साद समर्थपणे व्यक्त केली आहे.

प्रसून जोशी यांचे शब्द फार अप्रतीम आहेत. 


अर्ज़ियाँ सारी मैं चेहरे पे लिख के लाया हूँ
तुम से क्या माँगू मैं
तुम ख़ुद ही समझ लो
मौला मेरे मौला

 



परमेश्वरा, माझ्या इच्छा-आकांक्षा काय आहेत ते सर्व माझ्या चेहऱ्यावरुन तू वाचू शकतोस, तुला माझ्या मागण्या स्पष्ट शब्दात कशाला सांगू, तुच समजून घे.

(दादरा ताल आणि क़व्वालीच्या टाळ्या)

दरारें-दरारें हैं माथे पे मौला
मरम्मत मुक़द्दर की कर दो मौला
तेरे दर पे झुका हूँ, मिटा हूँ, बना हूँ
मरम्मत मुक़द्दर की कर दो मौला

माझ्या कपाळावर आठ्या नव्हे भेगा पडल्या आहेत, माझ्या भविष्याची एवढी काळजी करता करता...परमेश्वरा तू सगळे जाणतोस, तू माझ्या भविष्याची मशागत कर, ते उज्ज्वल कर....तुझ्या दारी आलो आहे नतमस्तक झालो आहे, माझे भवितव्य मातीमोल झाले आहे, तुझ्याकड़े आल्यावर पुन्हा उभारी आली आहे, माझ्या भवितव्याची तेवढी काळजी घे, माझ्या आयुष्याचे सोने कर..


जो भी तेरे दर आया, झुकने जो सर आया
मस्तियाँ पिए सबको, झूमता नज़र आया
प्यास लेके आया था दरिया वो भर लाया
नूर की बारिश में भीगता सा तर आया
मौला मेरे मौला...

तुझ्याकडे जो नतमस्तक होऊन आला तो मस्तीमधे नाचताना सगळ्यांना दिसला, त्याना माहित आहे तुझ्याकड़े आल्यावर कोणी "खाली हाथ" जात नाही. तो तहानलेला होता त्याला तूझ्याकडे आल्यावर नदी भरून वाहु लागली, त्याचे आयुष्य उजळून निघाले.


एक खुशबू आती थी, मैं भटकता जाता था
रेशमी सी माया थी, और मैं तकता जाता था
जब तेरी गली आया, सच तभी नज़र आया
मुझमें ही वो खुशबू थी, जिससे तूने मिलवाया
मौला मेरे मौला...

या कडव्याचा अर्थ महत्वाचा...
एक सुगंध यायचा आणि मी शोध घ्यायचो. तुझ्याकडे आल्यावर समजले की तो सुगंध माझ्याकडेच होता. माझ्याकडे काय कौशल्य आहे, ज्याचा शोध घेत आहे ते माझ्याकडेच आहे, सुख सुख म्हणजे काय हे तुझ्याकडे मागायचे कशाला, माझे सुख कशात आहे हे मलाच ठरवायला हवे.....हे मला तुझ्याकडे आल्यावर उमजले.

टूट के बिखरना मुझको ज़रूर आता है
वरना इबादतवाला सहूर आता है
सजदे में रहने दो, अब कहीं ना जाऊँगा
अब जो तुमने ठुकराया तो सँवर ना पाऊँगा
मौला मेरे मौला...

माझ्या आशा-आकांक्षांचा चुराडा झाल्यावर मी कोलमडुन पडलो आहे, ते मला आता चांगलेच जमते. आता मला प्रार्थनेमधला आनंद खरा समजायला लागला आहे. तुझ्याकडे आलो, आता मला कुठेही जायचे नाही. कारण तुझ्याकडे आल्यावर मला समजले की खरे सुख माझ्यात आहे, मी कसा विचार करतो त्यात आहे, त्यामुळे मला तुझ्याकडेच राहुदे. तुच जर ठोकरलेस तर कुठे जाणार?


सर उठा के मैंने तो कितनी ख्वाहिशें की थी
कितने ख्वाब देखे थे, कितनी कोशिशें की थी
जब तू रूबरू आया, नज़रें ना मिला पाया
सर झुका के एक पल में मैंने क्या नहीं पाया
मौला मेरे मौला...

माझ्या उद्धटपणामुळे मी माझ्या कितीं इच्छा-आकांक्षा मनात बाळगल्या होत्या, किती स्वप्ने पाहिली होती, त्यासाठी किती प्रयत्न केले होते........पण तू समोर आलास, तुझे दर्शन घेतले तेव्हा मी तुझ्या नजरेला नजर भिडवू शकलो नाही. खाली बघितले, नतमस्तक झालो आणि काय मिळवले नाही? एका क्षणात सगळेच मिळाले.


मोरा पिया घर आया, मोरा पिया घर आया
मौला मेरे मौला...

( अर्जी - दरख्वास्त, application; दरार - cracks, rift, gap; रूबरू - face to face, in person; नूर - light, splendour, सजदा - सर झुकाना)

परमेश्वराकडे जाताना आपण नेहमीच काही ना काही मागणे घेऊन जातो, मला सुबत्ता दे, मला सुखी ठेव, मला प्रमोशन दे, माझा पगार वाढू दे, झालाच तर माझ्या मुला/मुलीला चांगली नोकरी मिळू दे, त्याचाही प्रोमोशन कर, मी नाही झालो, त्याला लगेच चेअरमन कर, माझ्या 1BHK चा 2BHK कर, आता 3BHK कर, आता फार्म हाउस दे, माझ्यासाठी एक अफ्रीकेत असणारे काका दे, त्यांची खुप संपत्ती असु दे, मला अशा काकांबद्दल समजल्यावर लगेच त्यांचा मृत्यु होउ दे आणि त्यानीं घरात जमिनीखाली पुरलेल्या मोहरा फक्त मला मिळू दे, असे बरेच काही..

निर्व्याज प्रेम ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यावरसुद्धा आपण करत नाही..... आपण सरळ व्यवहार करत असतो त्याच्याबरोबर....तू मला अमुक तमुक दे, मी तुला अभिषेक करतो, चादर चढवतो, तुला सोन्याचा मुकुट देतो....आपली शक्ती त्याच्याशी व्यवहार करण्यात घालवतो, त्यालाच आपण म्हणतो, एक हाथ ले, एक हाथ दे. सुखाच्या शोधात असलेले आपण विसरतो की सुखी रहायचे की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे... अंथरूण पाहुन पाय पसरावेत ही आपल्याला मोठी स्वप्ने बघण्याची परवानगी न देणारी आपली संस्कृती हे एक टोक आहे. एकामागोमाग एक अंथरुणे आधाशाप्रमाणे गोळा करत बसतो ते दूसरे टोक आहे. सुवर्णमध्य आपल्याला गाठताच येत नाही.


सुहास किर्लोस्कर


पुढील लेख




Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास