अब के हम बिछड़े....




रागांचा परिचय त्यांच्या जवळचे राग ओळखत करता येतो हे सांगताना श्री राजीव साने यानी भुपेश्वरी रागाचा परिचय अलिकडेच करून दिला. भूप रागाचे स्वर - 
आरोह - सा रे ग प ध सा
अवरोह - सा ध प ग रे सा

भूप रागावर आधारीत गाणी - सायोनारा, ज्योती कलश झलके, पंछी बनू उड़ती फिरू, कांची रे कांची रे.......

भूप रागातला ध कोमल केला तर भूपेश्वरी राग होतो. या रागावर आधारीत एक अप्रतीम ग़ज़ल मेहदी हसन यानी संगीतबद्ध केली आहे आणि गायली आहे. गजलचा परिचय हिंदी चित्रपट संगीत, गुलाम अली, जगजीत सिंग असा झाल्यावर जेव्हा मेहदी हसन यांना अर्थ आणि चाल लक्षात घेऊन ऐकले तेव्हा समजले की खरी गजल ती मेहदी हसन यांचीच. गजलच्या अर्थाप्रमाणे निवडलेला राग, त्याचे भावपूर्ण सादरीकरण आपल्याला त्या माहोल मधें घेऊन जाते. रागाचे स्वरूपही ते सुंदररित्या उलगडून दाखवतात. भूप रागात ध कोमल लावला जातो, त्या ध मुळेच पूर्ण गाण्याचा माहोल बनतो. बिछडण्याचे दुःख मेहदी हसन यानी ध लावताना अधिक गहिरे केले आहे. अर्थात एकूण भूपेश्वरी रागातील स्वर या गझल मधील भाव समजावून सांगतात, ते संगीतकार मेहदी हसन आणि गायक मेहदी हसन या दोघांचे कौशल्य आहे. 

अहमद फराज यांची शायरी फार सुरेख.

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिले

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले










आता आपण एकमेकांपासुन विलग झालो आहोत तर कदाचित परत कधीच भेटणार नाही, कदाचित स्वप्नातच भेटु....जसे पुस्तकात जपुन ठेवलेल्या सुकलेले फुल सापडते तसे.... हे वियोगाचे दुःख म्हणजे जखमावरील खपल्या काढण्यासारखे आहे, निराशेचे सुर आहेत....तू तर आता निघुन गेली आहेस, पुन्हा आपली भेट होईल असे काही वाटत नाही. 


ढूंढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती
ये खज़ाने तुझे मुमकिन है ख़राबों में मिले
अब के हम बिछड़े...

आयुष्य बर्बाद झालेल्या अशा लोकांमधेच तुला विश्वासाचे अनमोल मोती सापडतील. असे खजाने तुला अशाच वैराण वाळवंटात / पडक्या हवेलीमधें म्हणजेच माझ्यासारख्या आयुष्य उध्वस्त झालेल्या मनुष्यात सापडतील. खरे प्रेम तर अशा उध्वस्त झालेल्या माझ्याकडे मिळेल, पण तू तर भेटणार नाहीस त्यामुळे माझा इथल्या लोकांवर विश्वास उडाला आहे, कदाचित माझ्यावरचा सुद्धा. तुझ्यावरचे निर्व्याज प्रेम तुला इथेच सापडेल. 



तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनों इन्सां हैं तो क्यों इतने हिजाबों में मिले
अब के हम बिछड़े...


तू देव नाहीस आणि माझे प्रेम देवदुतासारखे नाही. आपण दोघेही माणसेच आहोत..तर असे बुरख्यामधें का भेटायचे ? आपल्यात हा आडपडदा कशाला ? आपले प्रेम होते, आता आपण भेटलो तर एकमेकांना ओळख दाखवणार नाही? पूर्वीचे आपण एकमेकांना भेटणार नाही, कारण तू माझ्या आयुष्यात नाहीस. कधी भेटलोच तर ओळख नसल्यासारखे भेटणार ? 



ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबे जो शराबों में मिले
अब के हम बिछड़े...


जगातली सर्व दुःखे एकीकडे, तेवढेच दुःख तू नसण्याचे. जगातील-जगण्यातील सर्व दुःखे तू बिछडल्यामुळे झालेल्या दुःखात सामील झाली तर वेगळाच नशा चढतो, जसे एक शराब दुसऱ्या शराबमधें मिसळल्यावर नशा वाढतो...


अब न मैं हूँ, न तू है, न वो माज़ी है फ़राज़
जैसे दो साये तमन्ना के सराबों में मिले
अब के हम बिछड़े...


फ़राज़ म्हणतो, आता मी नाही, तू नसल्याने माझे अस्तित्वच राहिले नाही, तू नाहीस, ते आपले सुवर्णक्षण नाहीत, भूतकाळ हरवला आहे.....जसे दोन सावल्या आशा-आकांक्षाच्या मृगजळात मिळतात तसे आता तू मला सोडून गेली आहेस. आता आपण एकमेकांपासुन विलग झालो आहोत तर कदाचित परत कधीच भेटणार नाही, कदाचित स्वप्नातच भेटु....जसे पुस्तकात जपुन ठेवलेले सुकलेले फुल सापडते तसे.... हे वियोगाचे दुःख म्हणजे जखमावरील खपल्या काढण्यासारखे आहे, निराशेचे सुर आहेत....तू तर आता निघुन गेली आहेस, पुन्हा आपली भेट होईल असे काही वाटत नाही. 



भुपेश्वरी म्हणजेच प्रतीक्षा रागावर आधारीत याच गजलच्या धुनवरुन हृदयनाथ मंगेशकर यानी सुरेश भट यांच्या गजलसाठी चाल दिली. अब के हम बिछड़े आणि मालवून टाक दीप एकामागोमाग एक म्हणुन पहा, कितीं साम्य आहे ते लक्षात येईल. सुरेश भट यांची ही गजल प्रणयगीत आहे की विरहगीत ? ती एकटी जागी आहे, तो निजला आहे, तो विरहच आहे....की प्रणय ? 


लता मंगेशकर यानी सुरेख गायले आहे. तंबोरा, रुद्रवीणा, तबला आणि हलकेच वाजणारे टाळ यामुळे या गाण्याला वेगळेच परिमाण लाभले आहे.....गजलचा अर्थ लक्षात घेतला तर हे गीत ज्या स्थळी अपेक्षीत आहे तिथे असे गायले जाईल काय? पण जो परिणाम मिळतो त्यामुळे रेडियोवर भावगीत म्हणुन आपण सकाळ-संध्याकाळ-रात्र केव्हाही ऐकत होतो. 


मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस, एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग






अज़ीज नाजा यांची लोकप्रिय क़व्वाली "चढ़ता सूरज धीरे
धीरे" भुपेश्वरी रागावर आधारीत आहे पण त्याची रचना, स्वरांची मांडणी वेगळी आहे......वेगळी आहे? 






क़व्वालीचा वेग कमी करून मध्यलय दादरा तालात म्हणुन पहा...साम्यस्थळे दिसतील. क़व्वालीच्या सुरूवातीचे स्वर आता आपल्या परिचयाचे वाटतात. ही क़व्वाली अर्थपूर्ण आहे, त्याबद्दल सविस्तर परत कधीतरी.

सुहास किर्लोस्कर




Comments

  1. खरं आहे अब के हम बिचहडे ऐकताना मालवून टाक चा अपरिहार्यपणे आठवल्याशिवाय राहत नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास