बेंधेची बीना गान शोनाबो


बंगाली भाषिक रसिकांना बरीच गाणी पहिल्यांदा ऐकायला मिळाली आणि नंतर ती गाणी देशभर लोकप्रिय झाली. बंगाली संगीतकार सचिन देव बर्मन, हेमंतकुमार, सलिल चौधरी, राहुल देव बर्मन यानी बरीच गाणी बंगाली भाषेत आधी तयार केली. स्वतःचीच गाणी सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने असेल बहुतेक, पुन्हा हिंदी चित्रपटामधे आणली.  अर्थात त्यासाठी चित्रपटाच्या प्रसंगाप्रमाणे बदल केले, ऑर्केस्ट्रेशन बदलले,  शब्द वेगळे लिहून घेतले आणि त्या गाण्याचे वेगळेच स्वरूप आपल्यासमोर आले.

आज राहुल देव बर्मन यानी बंगाली भाषेत केलेली गाणी, त्याचे हिंदी स्वरूप आणि दोन्ही गाण्यातला फरक ऐकता येईल, अर्थात त्यासाठी आपली पाटी कोरी करून बंगाली गाणें नव्याने ऐकू, कदाचित संगीतकार काय विचार करत असतील याचा मागोवा घेता येईल.

राजकुमारी सिनेमामधें नायिका तनुजा आणि नायक उत्तमकुमार दोघे कारमधून चालले आहेत, या प्रसंगाला साजेसे गाणे
बोंधो दारेर आंधोकारे थाकबो ना
किशोर-आशा-आरडी

सॅक्सोफोनच्या साथीने आशा भोसले गातात, कारच्या वेगाने गाणें पुढे जाते, दुसऱ्या कडव्याची सुरूवात किशोरकुमारच्या स्वरात.  या गाण्यात खरी गंमत आहे दूसरी ओळ वरच्या स्वरात आहे, दोन्हीचा जोड़ आहे "तारा रारा रा रा".  हा जोड़ कोणत्याही वाद्याने न करता बोलानी केला आहे.  राहुल देव बर्मन यांच्या बऱ्याच गाण्यात वाद्यांवर वाजवायचे बोल गायले गेले आहेत, त्याचा वेगळा परिणाम होतो.


नासिर हुसैन यांच्या "यादों की बारात" चित्रपटात अभिनेता (?) तारिक़ क्लब सॉंग गातो.  सुरुवातीला यादों की बारात या  टायटल सॉंगच्या दोन ओळी गाऊन "बिछडलेला भाऊ" मिळतो का याचा प्रयत्न करतो.  नंतर गिटार वाजवत माहोल बदलतो आणि म्हणतो
गाने के बोल है, बोल आप अच्छी तरह जानते है.....
"आप के कमरे में कोई रहेता है"
मजरूह-किशोर-आशा-आरडी

पूर्ण गाण्याची treatment वेगळी आहे, गिटार-काँगो-बोंगो वाजतात.  दुसऱ्या कडव्याला क्लब गायक झिनतला बोलावतो तेव्हा जो किशोर-आशा या दोघांमधील संवाद आहे तो फक्त ते दोघेच म्हणू शकतात -
हे यू, लाल कपडोवाली मेमसाब
कौन, मैं ?
यहां आएंगी आप, क्या नाम है आपका ?
मेरा नाम? सुनीता
लव्हली नेम
थेँक्यु
आप गाएंगी मेरे साथ
ना,  डर लगता है (हे आशा भोसले अशा घाबरलेल्या आवाजात म्हणतात, असा अभिनय आशाच करू जाणे)

गाण्यामधील पुढचे कडवे, नंतर क्लब सॉंगप्रमाणे लोकाना बरोबर घेत गाणें गायले जाते, गाजलेल्या गाण्याची बरसात.
..सर्व काही प्रसंगाप्रमाणे.....मुळ बंगाली गाण्याचा पूर्ण ढाचा बदलून..

असाच एक बंगाली भाषेतला चित्रपट, 1981 सालचा...राजदरबारी गाणे सुरु आहे,  ठुमरी पद्धतीचे, परवीन सुलताना यांच्या आवाजात..
बेंधेची बिना, गान शोना...
या गाण्याची गंमत  पुढच्या ओळीत परवीन सुलताना मंद्र सप्तकातुन  गातात  त्यात आहे..."रागिनी धीरे धीरे, बाजेबी तानपुरा..".  सतार-बासरीने गाणें खुलते, परवीन सुलताना यानी गाण्याचा बाज ओळखून गायले आहे हे विशेष.  आद्धा तीनतालातुन समेवर येताना दीडपटीमधें तबला वाजतो ते विशेष लक्ष देण्यासारखे...इथे आरडी दिसतो.



हेच गाणें श्रेया घोषालने सुद्धा अलीकडे (1998) गायले आहे, ते सुद्धा श्रवणीय आहे.




बेमिसाल (1982) चित्रपटातील एक प्रसंग, अमिताभ-विनोद मेहरा हे दोन मित्र काश्मीर दर्शनाला जातात, तिथे त्याना राखीचे दर्शन होते, तिच्या आजारी वडिलांना एकाने सोबत करायची आणि एकाने राखीसह काश्मीर बघायचे असे ठरते.  या गाण्यात राहुल देव बर्मन यानी आद्धा तीनतालातील गाण्याचा रिदम पैटर्न बदलला आहे, तबल्याच्या "धातीं" ने वेगळा परिणाम साधला आहे.  अर्थात यात मिक्स रिदम आहे म्हणजे  बाकीचे बोल तबल्यावर वाजतात आणि "तीं" हा बोल मादल या वाद्यावर वाजतो, त्याचा परिणाम वेगळा आहे.  हे गाणें सतार-व्हायोलीनने सुरु होते. लता मंगेशकर गातात...

"ए री पवन, ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते"

संगीतकाराना लताचा तीव्र सप्तकातला आवाज आवडला असला तरीही मला मंद्र सप्तकात जास्त भावला आहे. "ए री पवन" हंसध्वनी रागाच्या स्वरात आहे, "बावरी सी तू खिले" मियां की मल्हार रागावर आधारीत आहे.  पंचम यानी सृजनशीलतेने एका रागातुन दुसऱ्या रागावर झालेले landing सुरेख.  "बावरी सी तू खिले, कौन है तेरा सजन" याचा अर्थ चित्रपटाच्या कथेला अनुरूप, शिवाय वाऱ्याला दिलेली ही साद आहे, आनंद बक्षी यानी.  कडव्याची चाल वेगळीच..."बादल से तेरा, क्या है कुछ नाता".  पहिल्या कडव्यापूर्वी सतार वाजते तर दुसऱ्या कडव्यापूर्वी संतुर.




राजकुमारी या बंगाली सिनेमात किशोरकुमार आशा भोसले यानी गायलेले आणि तनुजावर चित्रित झालेले आणखी एक सदाबहार गाणें "आज गुन गुन गूंजे अमार".  गाणें सुरु होते किशोरच्या आवाजात, एक ओळ गेल्यावर स्केल चेंज ऐकू येते आणि आशा भोसले गातात.  कडव्यामधें आशा भोसले यानी अशा काही हरकती घेतल्या आहेत की बस्स !!! वादये  बासरी, अकोर्डियन, सैक्सोफोन.




स्वतःचीच धुन हिंदीमधें आणताना पंचम यानी वेगळी treatment देत वेगळ्या वाद्यांचा उपयोग केला. कटीपतंग सिमेमात किशोरकुमारने गायलेले गाणें वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ऐकता येईल.  पियानोने गाण्याची सुरूवात होते. रेसोरेसो वाजते

प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है

आता असा विचार करावा की आपण पियानो वाजवत आहोत.  तशी बोटे फिरवण्याचा प्रयत्न केला तरी लक्षात येते की बऱ्याच वेळेस पियानो ऑफबीट वाजतो.  म्हणजे गाण्याची लय वेगळी आणि पियानोची लय वेगळी.  दुसऱ्या कडव्याला दिडपट लयीमधे पियानो वाजतो. त्याचा एकत्रीत परिणाम सुरेख.  किशोरकुमारने अप्रतीमरित्या गायलेले गाणें पियानोच्या वेगळ्या लयीत संपते.




अशी राहुल देव बर्मन यांची बंगाली-हिंदी  गाणी बरीच आहेत...

"एक दिन पाखी उरे" हे गाणें 1967 साली दुर्गापूजा अल्बमसाठी राहुल देव बर्मन यानी तयार केले, त्याचे हिंदी वर्जन म्हणजेच "तुम बिन जाऊं कहां" (1969)

ए की होलो - किशोर (राजकुमारी)
ये क्या हुआ - किशोर

जेते दो अमे - 1962 - गायक - राहुल देव बर्मन
जाने दो मुझे जाने दो - दिल पडोसी है - आशा-गुलज़ार-आर डी

चोलेची एका कोनो जाना - किशोर
चला जाता हुं - किशोर

जेते जेते पथे होलो - राहुल देव बर्मन
तेरे बिना जिंदगी से - किशोर-लता

देके देके काटो  - राहुल देव बर्मन
दिए जलते है - किशोर

तोमाते आमाते देखा- आर डी
दो नैनो में आंसू भरे है - लता

कथा दिए एले ना- आशा
कोई नही है कही - भूपेंद्र

आकाश केनो दाके - किशोर
ये शाम मस्तानी - किशोर

मोने पोरे रूबे रे
मेरी भिगी भिगी सी - किशोर

फिरे एशो ओनुराधा - आर डी / आशा - 1969 - Pooja Song
साजन कहां जाऊंगी मैं - जैसे को तैसा - 1973 - Haunting song
जहां पे सवेरा हो, बसेरा वोही है - लता मंगेशकर - 1981 - Piano effect
फिरे एलाम दुरे गिये - आशा आणि आर डी - Pooja song - 1986 - वेगळे युगुल गीत

बंगाली आणि हिंदी दोन्ही गाणी श्रवणीय आहेत.  आपण ऐकलेल्या गाण्याची impressions काढून नव्याने ऐकल्यासारखे बंगाली गाणी ऐकली तर वेगळाच आनंद मिळतो.  संगीतकार या नात्याने असाच विचार करावा लागत असेल काय? गायकानासुद्धा असाच प्रयत्न करावा लागत असेल ना?


✍ सुहास किर्लोस्कर



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास