सुननेवाले सुन लेते है



सुननेवाले सुन लेते है
कणकण में संगीत
धड़कन ताल है
सास है सुर
जीवन है एक गीत


जावेद अख्तर यानी लिहिलेल्या गीताचे संगीतकार आहेत उस्ताद झाकीर हुसेन.  श्रद्धा पंडित, श्वेता पंडित, सुरेश वाडकर यानी गायलेले हे गीत सई परांजपे दिग्दर्शित साज सिनेमातील आहे.  सुरूवातीच्या प्रसंगात घरातील 2 लहान मुली हे गाणें गात आहेत. वडील प्रख्यात नाट्यगीत गायक-अभिनेते.  अशा वातावरणात वाढलेल्या 2 मुली लहानपणी सगळ्या आवाजात संगीत न शोधतील तर नवल. दारुच्या आहारी गेलेल्या पण अत्यंत गुणी नाट्यगायकाची भूमिका रघुवीर यादव यानी फार सुरेख केली आहे.





रेल्वेत बसलो तर त्यालाही एक रिदम असतो, घरात भाकरी थापटत असताना एक ठेका एक लय असते.  आपण संगीत जिकडे कान देऊ तिकडे असते.  अर्थात यासाठी कान उघडे हवेत.  मॉर्निंग वॉक घेताना हेडफोन लावणाऱ्या लोकाना निसर्गातले संगीत ऐकू येणार नाही.  म्हणूनच ऐकणारे रसिंक सगळीकडे संगीत-लय-ताल ऐकतात.....डोंगरावर, रस्त्यावर, नवे-जुने, भारतीय-पाश्चात्य, उत्तर हिंदुस्थानी-कर्नाटक....संगीताचा रसिक असा भेदभाव करत नाही.    मध्यरात्री रातकिडयाची किरकिर सुद्धा लयीत असते.  हेच तर या गीताचे सार.    






फिर भोर भई, जागा मधुबनहे चित्रपटातील झाकीर हुसेन यानी संगीत दिलेले आणखी एक गाणें.  त्या मुली आता मोठ्या झालेल्या आहेत.  मोठी बहीण चित्रपट संगीत गायिका म्हणून नाव कमवायला सुरुवात करत आहे.  आलाप आणि तबला तरंग वाजतो आणि गाणे सुरु होते.  चित्रपट संगीताचे त्यावेळी जसे रेकोर्डिंग व्हायचे तसा स्टुडियोमधला प्रसंग आहे.  रेकोर्डिंग झाल्यानंतर चित्रपटाचे शुटींग होते.  नृत्य बसवले जाते.  यानंतर चित्रपटात ते देवकी पंडित यानी गायलेले हे गाणे दिसते.  अंतऱ्यापूर्वी तबला-पखवाज-सतार-सारंगीचा इंटरल्युड लक्षपूर्वक ऐकण्यासारखा आहे.  मोठी बहीण छोट्या बहिणीला शुटींग दाखवण्यास घेऊन येते आणि छोटी बहीण दीदीकडे कौतुकाने पाहते.  इथे तबल्यावर अभिनेता भाऊ कदम दिसतात.  त्यांना तबला तालावर वाजवता आलेला नाही.  इथे तबलावादकाची निवड होणे आवश्यक होते. 


यानंतर सिनेमा थिएटरमध्ये दाखवला जातो.  मधुबाला-दिलीपकुमार यांच्या चित्रपटातला प्रसंग दिसतो.  झाकीर हुसेन यांनी या प्रसंगाला अनुसरून संगीत दिले आहे.  कडव्यापूर्वीचा इंटरल्युड संपल्यानंतर पुन्हा मुखडा ज्या पद्धतीने घेतला आहे त्याला तोड नाही.  टेकऑफ इतकेच लँँडिंगसुद्धा महत्वाचे असते.  झाकीर हुसेन यांच्या संगीतामध्ये आणि वादनामध्ये त्याचे प्रत्यंतर येत असते.  अरुणा इराणी यांनी या वेगळ्या संधीचे सोने केले आहे.  शबाना आझमी यांचा अभिनय अर्थातच लाजवाब.  







रात ढलने लगी बुझ गए है दीये
राह तकते है हम जाने किसके लिये


हे गाणें गायले आहे सुंदर पण दुःखी गाण्याला वाजणारे बिट्स कानाला खटकतात.  शबानाच्या डोळ्यातील आर्तता सिनेमात बघण्यासारखी.  गाण्यातला सरोदचा परिणाम अप्रतीम.  हे सरोद वाजवले आहे उस्ताद अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आशीष खाँ यानी. दुसऱ्या कडव्याला सॅक्सोफोन वाजतो, तो का तसा वाजतो याचे उत्तर सिनेमा बघितल्यावर सनजते.  (दूर तक अब कोई संग साथी नही .... ) प्रसंगाप्रमाणे संगीत देणाऱ्या उस्ताद संगीतकाराला सलाम.




खरी कमाल केली आहे ती साज मधल्या या गाण्यात.......संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यासारखी भूमिका उस्ताद झाकीर हुसेन यानी केली आहे.  ते जेव्हा आपल्या आवडत्या गायिकेला भेटतात तेव्हा म्हणतात "आज मेरा पहला सपना पूरा हो गया...आपसे मिलने का" आपल्या आवडत्या "आयडॉल-आयकॉन" ला भेटण्याची पध्दतही अनोखी.....साष्टांग नमस्कार....दूसरे स्वप्न गायिकेकडून आपले गाणें गाउन घ्यायचे. या गाण्याचे  संगीतही वेगळे आहे.


गाणें सुरु होते ते झाकिर हुसेन तबला वाजवतात....

घीटतीर घीटतीर घीटतीर असा तबलावादनानंतर गाणे सुरु होते.
संगीत देण्याची प्रक्रिया, पहिल्यांदा चाल लागते, नंतर संगीतामधे वादये वाजतात...ही सर्व प्रकिया तिथे jhakir असल्यामुळे चांगली समजते.


क्या तुमने है कहे दिया, क्या तुमने है सुन लिया
तुम ही कहो, अब मैं कहूँ क्या

अंतऱ्या मधें तबला, डिस्टॉर्टेड गिटार,  राहुल देव बर्मन यानी श्वासाचा उपयोग केला, सैक्सोफोन सारख्या वाद्यांचा चपखल उपयोग केला, तालाचे बोल म्हटले...मृदंगमचा समयोचित वापर.....हे सर्व या गाण्यात ऐकू येते. रोमैंटिक फ्ल्यूट ची मजा अनोखी आहे.

चित्रपटाचे पार्श्वसंगीतसुद्धा ऐकण्यासारखे आहे.  संगीतकार (झाकीर) आणि गायिका (शबाना) यांच्यामध्ये मतमतांतरे होतात तेव्हा दोन वेगळ्या सुरात तबले म्हणजे तबलातरंग वाजला आहे.





परझानीया हा नसीरुद्दीन शाह अभिनीत चित्रपट आवर्जुन बघण्यासारखा.  या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक उ. झाकिर हुसेन यानी आणखी एका चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली - मिस्टर अँड मिसेस अय्यर. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट दंगलीच्या दरम्यान प्रवासात होणारी  ससेहोलपट दाखवतो आणि आपल्याला अस्वस्थ करतो.  अत्यंत गंभीर विषय फार संयमितपणे हाताळला आहे.  कोंकणा सेन आणि राहुल बोस यांचा नेसर्गिक अभिनय, बांधीव पटकथा आणि अपर्णा सेन यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन.  झाकीर हुसेन यांचे सिनेमाच्या वातावरणाला साजेसे संगीत चित्रपटाचा दर्जा अबाधित राखण्यास मदत करते.  या सिनेमातील गाणी गायली आहेत उदय भवाळकर, उ. सुलतान खान आणि उ. झाकिर हुसेन यानी !!!





If I'd known....Don't look away - झाकिर यांच्या आवाजात ऐकल्यावर सिनेमाचा माहोल तयार होतो. सिनेमाच्या टायटल सॉंग मधें फार कमी वाद्ये वाजतात तरीही आपण ताल धरतो.  विशेष म्हणजे गाण्यात तालवाद्य वाजलेले नाही.  उत्कृष्ट संगीतकारांनी शांततेचा वापर फार सुरेख केला आहे.  हा चित्रपट हे याचे एक उदाहरण आहे.





किथे मेहेर अली, हे झाकिर आणि सुलतान खान यानी गायलेले गाणें प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐकले की संगीताची जादू समजते.

उस्ताद झाकिर हुसेन प्रख्यात तबलावादक म्हणुन प्रसिद्ध आहेतच.  त्यांचा सोलो तबला, वेगवेगळ्या वाद्याना आणि दिग्गज वादकाना त्या वाद्याचा विचार करून केलेली साथ, जनसामान्यापर्यंत लोकप्रिय केलेला तबला, आंतरराष्ट्रीय/जागतीक संगीतामधे त्यानीं केलेली साथ, शक्ती सारखे केलेले प्रयोग यात त्यांची ख्याती आहेच.  त्यांनी जाझ संगीताला सुद्धा तबला साथ केली आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर उस्ताद जेव्हा संगीत संयोजन करतात ते बघण्यासारखे आणि ऐकण्यासारखे असते.

झाकीर हुसेन यांनी संगीत दिग्दर्शन केलेले चित्रपट -

साज
परझानिया
मिस्टर & मिसेस अय्यर
मंटो
Heat & Dust
In Custody
Everybody says I am fine
The Mystic Masseur
Apocalypse Now (Tabla)
The Second Best Exotic Marigold Hotel
The Perfect Murder
वनप्रस्थाश्रम


हा लेख लिहित असताना वनप्रस्थाश्रम या चित्रपटाबद्दल समजले.  मोहनलाल-सुहासिनी यांच्या अभिनयाने समृद्ध असलेला चित्रपट, अभिनय, कथकली आणि झाकीर हुसेन यांचे कथकलीची वातावरणनिर्मिती करणारे झाकीर हुसेन यांच्या संगीतासाठी सुद्धा बघण्यासारखा आहे.





त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या काही चित्रपटातील गाण्यांचा थोडक्यात मागोवा....... 9 मार्चला त्यांच्या वाढदिवसानिमित्त..

There are known knowns; there are things we know we know. We also know there are known unknowns; that is to say we know there are some things we do not know. But there are also unknown unknowns — the ones we don't know we don't know - Donald Rumsfeld

झाकीर हुसेन यांनी काही हिंदी चित्रपट संगीतामध्ये तबला साथ केली आहे.  "सुनो सजना पपीहे ने", "सलामत रहे" (रफी)....अशी अनेक गाणी सांगता येतील.  त्यांच्या संगीताबद्दल एक समजून घेण्याचा प्रयत्न करताना  दुसरे नवीनच काही समोर येते.  There is unknown unknown about him and his music. उदाहरणार्थ जाझ संगीताचे केलेले संगीत संयोजन आणि तबला साथ, आणखी असे बरेच काही.

प्रत्येक कार्यक्रमातून एक वेगळा संगीत विचार देणाऱ्या उस्तादजीना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


सुहास किर्लोस्कर









Comments

  1. वाह,अप्रतिम शब्द-शुभेच्छा.. !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास